डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे हृदयविकाराचा झटका आणि श्रवणशक्तीवर परिणाम

लग्नसमारंभ, मिरवणुका आणि उत्सवांमध्ये सर्रास वापरला जाणारा डीजे आता केवळ मनोरंजनाचे साधन राहिला नसून, तो आरोग्यासाठी एक मोठा धोका बनला आहे. कानठळ्या बसवणारे हे आवाज थेट हृदयविकाराचे झटके, मेंदूला इजा आणि लहान मुलांची श्रवणशक्ती कमी होण्यासारख्या गंभीर समस्या निर्माण करत आहेत. यामुळे डीजेवर कायदेशीर बंदी असूनही त्याचा सर्रास वापर सुरू असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

सामान्य मानवी कान ६० ते ८५ डेसिबलपर्यंतचा आवाज सहन करू शकतो. मात्र, डीजेचा आवाज या मर्यादेच्या कितीतरी पुढे जातो, ज्यामुळे श्रवणशक्तीवर गंभीर परिणाम होतो. विशेषतः वृद्ध व्यक्ती, हृदयविकाराचे रुग्ण आणि नवजात बाळांसाठी हा तीव्र आवाज जीवघेणा ठरू शकतो. छातीत धडधड होणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि अचानक झटका येणे अशा तक्रारीही समोर आल्या आहेत.

पोलिस आणि पर्यावरण खात्याच्या नियमांनुसार डॉल्बी आणि उच्च डेसिबलच्या डीजेवर बंदी आहे, तरीही अनेक कार्यक्रमांमध्ये रात्री उशिरापर्यंत हे नियम धाब्यावर बसवले जातात. अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीजे वाजवण्यावर बंदी असूनही त्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शांतता समितीच्या बैठकांमध्येही याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या या डीजेच्या वापराबाबत प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे