मुसळधार पावसातही वारकऱ्यांचा उत्साह कायम; माऊलींच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान!

Dnyaneshwar Maharaj Palkhi Procession in Rain
मुसळधार पावसातही वारकऱ्यांचा उत्साह कायम;

Dnyaneshwar Maharaj Palkhi Procession in Rain: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी अलंकापुरी भाविकांच्या गर्दीने दुमदुमून गेली होती. पण गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे अनेक वारकऱ्यांना यंदा पवित्र इंद्रायणीत स्नान करता आले नाही, पण त्यांच्या उत्साहात तिळमात्रही कमी नव्हता. गुरुवारी (१९ जून) रात्री आठ वाजल्यानंतर माऊलींच्या पालखीने पंढरीकडे प्रस्थान केले.

जाधववाडी तलाव ९५ टक्के भरल्याने इंद्रायणीत पाणी सोडण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. यामुळे इंद्रायणी नदीचे दोन्ही काठ पाण्याने पूर्ण भरले आहेत. भक्ती सोपान पूल आणि भक्त पुंडलिक मंदिरही पाण्याखाली गेले आहे. नदीची पाण्याची पातळी धोक्याची असल्याने प्रशासनाने वारकऱ्यांना नदीत न उतरण्याची विनंती केली होती.

प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत वारकऱ्यांनी सुरक्षिततेचा विचार करून स्नानाचा मोह आवरला.
पावसाचा जोर मावळ आणि लोणावळा परिसरात अधिक असल्याने इंद्रायणी नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, संबंधित नगरपालिका आणि महापालिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या सर्व परिस्थितीतही आळंदीकरांनी आपली निष्ठा आणि सेवेची परंपरा कायम ठेवली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जन्मोत्सव सोहळ्याप्रमाणेच, या आषाढी वारीतही त्यांनी निःस्वार्थ सेवा दिली आहे. आळंदी देवस्थानला दिलेल्या माहितीनुसार, आळंदीकर दोन ट्रक, दोन टँकर आणि एक टेम्पोसह अनेक सेवा पंढरपूरपर्यंत पूर्णपणे मोफत देणार आहेत. यामध्ये मानाच्या बैलांच्या चाऱ्याची वाहतूक आणि खर्चही आळंदीकरच करणार आहेत, अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीर यांनी दिली. पावसामुळे आलेल्या अडचणींवर मात करत, वारकऱ्यांनी आपल्या भक्तीचा आणि एकजुटीचा एक सुंदर आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे