या राज्यांतील सरकारांनी पुतीनकडून लस मागवायची काय? शिवसेनेचा भाजपला सवाल

मुंबई, २४ ऑक्टोबर २०२०: २२ बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या आश्वासनांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये पहिल्या स्थानावर कोरोना वरची मोफत लस देण्याबाबत आश्वासन दिले गेले होते. यावर विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच फैलावर घेतले. निवडणूक आयोगामध्ये देखील याबाबत तक्रार करण्यात आली. इतकेच काय तर राहुल गांधींनी असं देखील म्हटलं होतं की, जर तुम्हाला मोफत लस हवी असेल तर तुमच्या राज्यातील निवडणुकीच्या तारखा जाणून घ्या. आता शिवसेनेने देखील भाजपच्या या आश्वासनावर निशाणा साधत टीका केली आहे. “पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, ओडिशा, पंजाब, राजस्थान अशा राज्यात भाजप विचारांची सरकारे नाहीत. त्यांनाही ‘लस’ देण्याबाबत केंद्र सरकार हात आखडता घेणार काय? या राज्यांतील सरकारांनी पुतीनकडून लस मागवायची काय?” असा सवाल शिवसेनेन उपस्थित केला आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून शिवसेनेने अनेक प्रश्न केंद्राला विचारले आहे. “बिहारमध्ये जे काय निकाल लागायचे ते लागतील, पण भाजपने मोफत लसीच्या सुया टोचण्याचे ‘फुकट’ उद्योग सुरू केले आहेत. बिहारला ‘लस’ मिळावी याबाबत दुमत नाही, पण इतर राज्ये काही पाकिस्तानात नाहीत. कोरोना लसीचा मुद्दा भाजपच्या बिहारी घोषणापत्रात यावा हे योग्य नाही. लसीचे वितरण सरकारची आणि राष्ट्रीय भूमिका असायला हवी. ही एक प्रकारे भेदाभेदीच आहे. राष्ट्रीय एकात्मतेस नव्या लसीची गरज आहे!” असा टोला शिवसेनेनं मोदी सरकारला लगावला आहे.

“भारतीय जनता पक्षाचे नक्की धोरण काय? त्यांचे दिशादर्शक कोण? याबाबत थोडे गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले दिसते. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी जनतेला आश्वासन दिले होते की, कोरोनावर ‘लस’ येताच ती देशातील सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. पंतप्रधानांनी लसीचे वितरण करताना कोठेच जात, धर्म, प्रांत, राजकारण मध्ये आणले नाही, पण आता बिहार विधानसभेच्या प्रचारात भाजप नेत्यांनी विचित्र भूमिका घेतली आहे. कोरोनावरील लसीचे उत्पादन सुरू झाल्यावर बिहारमधील जनतेला ती लस मोफत उपलब्ध केली जाईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तर सांगितले आहे.”

“बिहारात मैदानात जाहीर सभा सर्व सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून होत आहेत. नेत्यांची हेलिकॉप्टर्स उडत आहेत. प्रचंड गर्दीचे कार्यक्रम सुरू आहेत. त्या गर्दीत बहुधा ‘कोरोना’ चिरडून मरणार आणि राजकीय क्रांती होणार असेच चित्र बिहारात आहे. लोकांना कोरोनाची भीती राहिलेली नाही. त्यांना बिहारात सत्ताबदल करायचा आहे. बिहारमध्ये जे काय निकाल लागायचे ते लागतील, पण भाजपने लोकांच्या मनात कोरोनाची भीती वाढवून मोफत लसीच्या सुया टोचण्याचे ‘फुकट’ उद्योग सुरू केले आहेत,” असेही शिवसेनेनं म्हटलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा