सहकार्य न केल्यास बळजबरीने घरी बसवू: तुकाराम मुंडे

नागपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढेंनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत स्वत: घरी बसून गंभीर रोगाचा प्रादुर्भाव कमी करणे हाच एकमेव उपाय आपल्यासमोर आहे. गांभिर्य लक्षात घेऊन नागरिकांनी सहकार्य केले नाही तर त्यांना घरी बसवण्यासाठी पुढचे पाऊल उचलावे लागेल, असेही तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.

लॉक डाऊनची परिस्थिती जनतेसाठीच नव्हे तर प्रशासनासाठीही चांगली नसते. विनाकारण गर्दी टाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. केवळ दुकाने बंद ठेवून प्रश्न सुटणार नाही. लोकांनीही विनाकारण गर्दी टाळायला हवी. जर नागरिकांनी सहकार्य केले नाही, तर त्यांन बळजबरीने घरात बसवू, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. कोरोना विषाणूच्या वेगाने होणारे संक्रमण रोखण्यासाठी देशभरातील नागरिकांना सरकार आणि प्रशासनाकडून घरी थांबण्याची विनंती करण्यात येत आहे. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, अशी विनंती वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही शहरात आजही लोक बाहेर पडत आहे.

नियम झुगारुन बाहेर पडणाऱ्यांवर दंडाची कारवाई करणार का? असा प्रश्न मुंढे यांना विचारण्यात आला होता. प्रत्येक प्रश्न हा दंड केल्यामुळे सुटत नाही. कोरोनाची परिस्थिती याने कमी होणार नाही, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे, असे सांगत त्यांनी यावर बाहेर न फिरणे हाच एकमेव उपाय असल्याचे सांगितले. सध्याच्या घडीला अत्यावश्यक सेवा लक्षात घेता सार्वजनिक बस सेवा सुरु ठेवण्यात आली आहे. टप्याटप्याने यात बदल करुन गरज पडल्यास सेवा स्थगित करण्यात येईल, असेही मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत 4 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. सुदैवाने आकडा स्थिर असून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन मुंढे यांनी केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा