मुंबई २३ जून २०२३: मुंबईत माहीम परिसरात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचा फोटो असलेला बॅनर लावण्यात आला होता. मध्यरात्री अज्ञातांनी हे बॅनर लावले असून स्थानिक शिवसैनिकांनी तात्काळ हा बॅनर हटवला. या बॅनरमुळे एकच खळबळ उडाली आहे.
या बॅनरमुळे भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवून फुले चढवणारे उद्धव ठाकरे गटाचे मित्र कसे?आणि सावरकरांची बदनामी करणारे उद्धव ठाकरे यांचे सोबती बनतात. त्यामुळे महाराष्ट्र आता त्यांना प्रश्न विचारत आहे की, की तुम्हाला सावरकर हवेत की ऒरंगजेब? काय ते स्पष्ट उत्तर द्या. इथं इथं पाणी आणि गोल गोल राणी करू नका, असेही शेलार म्हणाले.
दरम्यान उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आज पाटणा येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आयोजित केलेल्या देशभरातील विरोधकांच्या बैठकीसाठी पाटण्यामध्ये आहेत. आता यावर उद्धव ठाकरे गटाची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर