उत्तर प्रदेश : (दि. २३ एप्रिल २०२०)
उत्तर प्रदेश मधील कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ यांच्या एका समूहाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी भेडसावत असलेल्या असुविधांची माहिती दिली होती. या घटनेनंतर त्यांना बुधवारी एका गेस्टहाउसमध्ये स्थानांतरित करण्यात आले. हे डॉक्टर्स आणि कर्मचारी कोरोना संक्रमित रुग्णांचा इलाज करत असल्यामुळे त्यांना घरी जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांची राहण्याची व्यवस्था एका सरकारी शाळेमध्ये केली गेली होती. त्या सरकारी शाळेमध्ये असुविधांबाबत त्यांनी अनेक व्हिडिओ बनवले होते. वैद्यकीय कर्मचार्यां नी जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एसके शर्मा यांना पत्रही लिहिले.
डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची काळजी घेण्यासाठी पाठवले गेले. मंगळवारी संध्याकाळी त्यांची तात्पुरती व्यवस्था सरकारी शाळेत केली गेली. ही शाळा कोरोनाचे रूग्ण असलेल्या रुग्णालयाजवळ आहे. डॉक्टरांनी या दिलेल्या जागेची दुरावस्था दाखवणारे दोन व्हिडिओ तयार केले. त्यापैकी एक बुधवारी पहाटे बनवला गेला होता तर दुसरा दुपारच्या जेवणाच्या वेळेस बनविण्यात आला होता.
या दोन्ही व्हिडिओमध्ये त्यांनी भेडसावत असलेल्या समस्या मांडल्या होत्या. त्यातल्या पहिल्या व्हिडिओमध्ये त्यांनी दाखविल्याप्रमाणे, खोल्यांमध्ये लाईटची व्यवस्था नाही तसेच बाथरूम मध्ये पाण्याची व्यवस्था नाही, रूम स्वच्छ नाहीत तर क्वारंटाईन नियमांच्या विरुद्ध असूनही एकाच रूम मध्ये चार बेड लावले गेले आहेत.
दुसऱ्या व्हिडिओमध्ये, शासनाकडून पुरविल्या जाणाऱ्या निकृष्ट भोजन व्यवस्थेबाबत त्यांनी व्यथा मांडली आहे. एकाच पिशवी मध्ये पुरी आणि भाजी एकत्र करून दिल्याचे व्हिडिओमध्ये त्यांनी दाखवले आहे. पिण्याच्या पाण्याचा वीस लिटरचा एकाच जार तेथे ठेवण्यात आल्याची खंतही त्यांनी यात दाखविली आहे.
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शर्मा यांच्या वक्तव्यानुसार, व्हिडीओ समोर आल्यानंतर आता डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सर्व तक्रारींची दखल घेण्यात आली असून त्याचे निराकरण करण्यात आले आहे. त्या सर्वांची व्यवस्था आता जवळच्या गेस्ट हाऊसमध्ये केलेली असून तेथे स्वच्छ स्वयंपाकघराचीही व्यवस्था करण्यात आली आहे.