Retinol Skincare Benefits: आजकाल जिथे बघावं तिथे एकाच गोष्टीची चर्चा: रेटिनॉल! सोशल मीडियावर तर याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. युट्यूब, इन्स्टाग्राम रील्सपासून ते स्किनकेअर इन्फ्लुएन्सर्सपर्यंत, सगळेच ‘रेटिनॉल’च्या गुणगाण गाण्यात मग्न आहेत. पण हे रेटिनॉल नेमकं आहे तरी काय, ज्यामुळे आजची ‘नो-फिल्टर’ जनरेशन याच्या इतकी प्रेमात पडलीये की लोक जेवायचं विसरतील पण रेटिनॉल लावायला विसरत नाहीत? चला, जाणून घेऊया या ‘ब्युटी गेम चेंजर’बद्दल!
काय आहे हे रेटिनॉलचं रहस्य?
तुम्हाला माहितेय का, रेटिनॉल म्हणजे व्हिटॅमिन ए चा एक शक्तिशाली प्रकार! हे आपल्या त्वचेच्या पेशींना पुन्हा नव्याने तयार करण्याची आणि वाढवण्याची प्रक्रिया सुपरफास्ट करतं. म्हणूनच, याला स्किनकेअर जगतात ‘गेम चेंजर’ असं म्हटलं जातंय. जणू काही तुमच्या त्वचेला ‘रिसेट’ करण्याचं हे एक जादूई बटणच!
तरुणाईला का भुरळ घालतंय हे ‘जादुई’ क्रीम?
आजच्या तरुणाईला ‘ग्लास स्किन’ आणि ‘नो-फिल्टर’ लूक हवा आहे. मेकअपच्या थरांपेक्षा नैसर्गिक, निरोगी आणि चमकणारी त्वचा हाच आता ट्रेंड आहे. आणि याच ट्रेंडमध्ये रेटिनॉलने एन्ट्री केलीये ‘शॉर्टकट सोल्युशन’ म्हणून!
- पिंपल्सना राम राम: चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलाला नियंत्रणात आणून पिंपल्सना ‘टाटा बाय-बाय’ करतं.
- डाग आणि पोर्स गायब: जुन्या त्वचेचा थर काढून नवीन, चमकदार त्वचा बाहेर येते. यामुळे चेहऱ्यावरील डाग आणि मोठे पोर्स कमी होतात.
- पिग्मेंटेशनला सुट्टी: त्वचेचा टोन एकसमान बनवून पिग्मेंटेशनला दूर पळवतं.
- यंग लूकचा मंत्र: त्वचेला घट्ट आणि तरुण बनवून एजिंगच्या लक्षणांना दूर ठेवतं. (होय, आजकालची पोरं-पोरी एजिंगबद्दलही जागरूक झालीत!)
लावायचं कसं? (एकदम सोपं!)
तुम्ही म्हणाल, ‘इतके फायदे तर लावायचं कसं?’ अगदी सोपं आहे! रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक वाटाण्याएवढं (मटार) प्रमाण कोरड्या चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावल्यानंतर लावायचं. आणि हो, सकाळी सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका! कारण रेटिनॉल वापरल्यावर त्वचा सूर्याच्या किरणांना जरा जास्तच संवेदनशील होते.
सोशल मीडियाचं ‘रेटिनॉल’ कनेक्शन!
आजकालचे मेकअप युट्युबर्स आणि इन्फ्लुएन्सर्स देखील ‘मेकअप’पेक्षा ‘स्किन प्रेप’वर जास्त भर देतात. त्यांची थीम असते, ‘चांगली त्वचा असेल तर मेकअपची गरजच काय?’ आणि याच ट्रेंडमध्ये रेटिनॉल फिट बसतं. त्यांचे ‘बिफोर-आफ्टर’ फोटो पाहून तर कोणीही याच्या प्रेमात पडेल.
‘फायदे दिसतात’
‘वयाचा काही संबंध नाही’, ‘सर्वांसाठी सुरक्षित’ – हेच या रेटिनॉलच्या लोकप्रियतेचं रहस्य आहे. किशोरवयीन मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच आता रेटिनॉल वापरत आहेत. ब्रँड्सनीही वेगवेगळ्या स्किन टाईपसाठी सुरक्षित फॉर्म्युलेशन्स बाजारात आणली आहेत. तर, आता तुम्हाला कळलंच असेल की, हे रेटिनॉल क्रीम म्हणजे आजच्या तरुण पिढीची ‘ब्युटी ऑब्सेशन’ का बनलंय! तुमच्या स्किनकेअर रूटीनमध्ये याला सामील करायचा विचार करताय का?
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे












































