गोल पोस्ट महाराष्ट्र नाशिक २५ लाखांसाठी डॉक्टर पत्नीचा खून, सासऱ्यासह डॉक्टर पतीवर गुन्हा दाखल

२५ लाखांसाठी डॉक्टर पत्नीचा खून, सासऱ्यासह डॉक्टर पतीवर गुन्हा दाखल

नांदगाव, नाशिक १२ ऑक्टोबर २०२३ : नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे, २५ लाखांसाठी डॉक्टर पतीने समव्यावसायिक असलेल्या पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली. गावात दुसऱ्यांदा खुनाची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत डॉक्टर पत्नीच्या भावाने नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलीय. डॉक्टर पती आणि सासऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या आठवड्यात न्यायडोंगरी गावात दारूड्या पतीचा, पत्नीने आपल्या अल्पवयीन मुलाच्या सहाय्याने खून केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा नांदगावच्या न्यायडोंगरी गावात दुसरा खुनाचा गुन्हा घडल्यामुळे न्यायडोंगरी हादरून गेली आहे. मृत डॉ. भाग्यश्री किशोर शेवाळे (वय २७, रा. न्यायडोंगरी) हिला दगडाने ठेचून तसेच काचेची बाटली मारून ठार मारले, अशी फिर्याद मृत डॉ. भाग्यश्री शेवाळे यांचा भाऊ सचिन कैलास साळुंखे (रा. तितरखेडा, ता. वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) यांनी दिली. नांदगाव पोलीस ठाण्यात डॉ. किशोर शेवाळे आणि त्यांचे वडील नंदू राघो शेवाळे यांच्याविरोधात रजिस्टर नंबर CCTNS ४४५ / २०२३ भादवी कलम ३०२, ३०४ (ख) ३४ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, गेल्या २७ सप्टेंबरला संध्याकाळी साडेसहा ते रात्री अकरा दरम्यान मन्याड फाटा या ठिकाणी दुचाकीचा अपघात झाल्याचा बनाव करून डॉ.भाग्यश्री मृत झाल्याचे सांगितल्याने चाळीसगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पण हे घटनास्थळ नांदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने शून्य नंबरने नांदगाव येथे वर्ग करण्यात आला होता. काल तब्बल १५ दिवसांनंतर मृत डॉ. भाग्यश्रीचा भाऊ सचिन साळुंखे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी बहीण भाग्यश्रीकडे पती डॉ. किशोर, तिचे सासरे नंदू शेवाळे नेहमी घर व दवाखाना बांधण्यासाठी २५ लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करीत होते. 

ही मागणी तिच्याकडून पूर्ण न झाल्याने केवळ २५ लाखांसाठी संशयित डॉ.किशोर शेवाळे, नंदू शेवाळे यांनी डॉ.भाग्यश्रीला दगडाने ठेचून व काचेची बाटली मारून खून केल्याचा आरोप केला आहे. या घटनेचा तपास मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, उपनिरीक्षक नितीन खंडागळे, मनोज वाघमारे, संतोष बहाकर करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : नाना अहिरे

error: Content is protected !!
Exit mobile version