इंदापूर, दि.१७ मे २०२०: इंदापूर तालुक्यात २ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असले तरीही जनतेने भीती बाळगण्याचे कारण नाही. मात्र कोरोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी जनतेने थोडासाही हलगर्जीपणा न करता नियमांचे गांभीर्याने पालन करावे, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज(रविवारी) केले.
मास्क व सँनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंग पाळणे तसेच कमीपणा अथवा अपमान न समजता लक्षणे दिसून आल्यास तात्काळ आरोग्य तपासणी करून घेणे, या चतुसुत्रीचा अवलंब जनतेने करावा असे आवाहन त्यांनी केले.
पाटील पुढे म्हणाले की, सध्या पुणे, मुंबई अथवा इतर शहरातून नागरिक मोठ्या संख्येने इंदापूर तालुक्यात येत आहेत.त्यांना आपण अडवू शकत नाही ती आपलीच माणसे आहेत. मात्र त्यांना तालुक्यात आल्यावर १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे. याबाबत जनतेने जागृत राहिले पाहिजे.
आम्ही तीन दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यात ६ ठिकाणी स्वॅब तपासणी केंद्रे चालू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने ३ ठिकाणी स्वॅब तपासणी केंद्रे चालू केली आहेत. याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले. राज्य सरकारने लॉकडाऊनचा कालावधी दि. ३१ मे पर्यंत वाढवला आहे. मात्र कोरोना हा लगेच संपणारा रोग नाही, त्यामुळे आगामी काळात कोरोनासह जीवन जगण्यासाठी नियम कटाक्षाने पाळण्याची जागरूकता व मानसिकताही नागरिकांमध्ये निर्माण होणे गरजेचे असल्याचे मत या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे