पुरंदर, २० ऑक्टोबर २०२०: शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत शेतकऱ्यांना पोहोच होईल, असे आश्वासन आमदार संजय जगताप यांनी दिले. पुरंदर मधील ढग फुटीची आमदार संजय जगताप यांनी आज पाहणी केली यावेळी ते लोकांशी बोलत होते.
पुरंदरच्या पूर्व भागातील आंबळे, राजेवाडी, वाघापूर, गुरोळी येथे रविवारी झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे, घरांचे, विहिरी, बांध बंधाऱ्याचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. लाखो रुपये कर्ज काढून शेतकऱ्यांनी शेतात फळे, भाजीपाला, कांदे, ऊस यासारखी पिके घेतली होती. पिके जोमाने वाढवली होती. मात्र तीन साडेतीन तास झालेल्या ढगफुटीच्या पावसाने सर्व काही माती मोल झाले, पिके दिसेनाशी झाली. बांध बंधारे, ताली फुटल्या विहिरी बुजल्या, रस्ते वाहून गेले, घरांच्या भिंती पडल्या या सर्व नुकसानीची पहाणी आज पुरंदरचे आमदार संजय जगतापयांनी केली.
यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, पंचायत समितीच्या सदस्या सुनीता कोलते, आंबळेचे माजी सरपंच सुभाष जगताप, मंगेश गायकवाड, आबा जगताप, काँग्रेसचे नेते विकास इंदलकर, बाळासाहेब कुंजीर, अक्षय उरसळ, माऊली बधे, राजेवाडीचे माजी उपसरपंच गौतम जगताप, विठ्ठल जगताप, सचिन दरेकर, लालु अण्णा जगताप, भाऊ शितोळे, योगेश हिंगणे, विनोद जगताप यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी आंबळे येथील चीचकूटवस्ती, मुबंईवस्ती, बेंदवस्ती, शिंदेमळा व राजेवाडी येथील पुरात वाहून गेलेल्या शेतीची पहाणी आमदारांनी केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे.