माझ्या वाढदिवसाला पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणू नका, गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटा, सुप्रिया सुळेंचे कार्यकर्त्यांना आव्हान

मुंबई,३० जून २०२३ : राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाढदिवसा निमित्त सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांना विशेष आवाहन केले आहे. मला वाढदिवसानिमित्त भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊ नका तर एक वेगळे कार्य करा. जेणे करून मला माझ्या वाढदिवशी अनमोल भेटवस्तू मिळेल, असे सुप्रिया सुळे आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब आहे. या कुटुंबातील सर्वच सदस्यांना माझ्याप्रती असणारा जिव्हाळा व आस्था नेहमीच व्यक्त होत असते. उद्या माझ्या वाढदिवसानिमित्तही अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व शुभचिंतक प्रत्यक्ष भेटून आपल्या शुभेच्छा मला देण्यासाठी उत्सुक आहेत याची मला जाणीव आहे. आपणा सर्वांना मी एकच नम्र आवाहन करू इच्छिते की शुभेच्छूकांनी फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू न आणता त्याऐवजी आपल्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या गरजू शाळकरी मुलांना पुस्तके, शालेय वस्तू, रेनकोट, भेटवस्तू आदींचे वाटप करावे. असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे.

या सामाजिक उपक्रमाचे फोटो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करावेत, मी ते माझ्या सोशल मीडिया माध्यमांवर शेअर करेन. आपला पक्ष हा नेहमीच आपली समाजाप्रतीची बांधिलकी जपत आला आहे. आपण या गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा उपक्रमही नेहमीच्याच तत्परतेने राबवावा, माझ्यासाठी वाढदिवसाची हीच अनमोल भेट ठरेल.

सुप्रिया सुळे यांना वाढदिवसानिमित्त अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा, असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.तर आमदार रोहित पवार यांनीही ट्विटच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवणाऱ्या संसदरत्न खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!, असे ते म्हणाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा