उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या बिला कडे बघू नका त्यांच्या कष्टाकडे बघा: दत्तात्रय भरणे

इंदापूर, दि. १ जुलै २०२०: उपचार करताना डॉक्टर कोणताही कुचराई करत नसतो. मात्र याच डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे लोकांचे आरोग्य सुस्थितीत होते, मात्र उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या बिला कडे बघितले जाते. असे न करता डॉक्टरांच्या कष्टाकडे बघा असे आवाहन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

इंदापूर शहरात राष्ट्रीय वैद्य दिन व कृषी दिनानिमित्ताने रोटरी क्लब ऑफ इंदापूर व आय.एम.ए इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना जन्य परिस्थितीमध्ये योगदान दिलेल्या डॉक्टरांचा विशेष सन्मान सोहळा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी भरणे बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, रोटरी क्लब ऑफ इंदापूर चे अध्यक्ष अजिंक्य इजगुडे, आय.एम.ए चे डॉ. नामदेव गार्डे, शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एकनाथ चंदनशिवे, रोटरी क्लब ऑफ इंदापूर चे माजी अध्यक्ष राकेश गणबोटे, वसंतराव मालुंजकर, धरमचंद लोढा, ज्ञानदेव डोंबाळे, हरीदास हराळे,प्रशांत शिताफ, भीमाशंकर जाधव, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, डॉक्टर देखील माणूसच आहे. मात्र रात्रंदिवस रुग्णांना सेवा देण्यासाठी मनापासून कष्ट घेऊन, आजार याला बरा करणे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर डॉक्टर मंडळींच्या असते. मात्र चांगले काम करून देखील,कुठेतरी डॉक्टरांवर हल्ले होणे हे बरोबर नाही.ज्या लोकांनी चांगले काम केले आहे त्यांना असे झाल्यानंतर प्रचंड वेदना होतात याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.डॉक्टरांना देखील घर असते, प्रपंच असतो. कुटुंब असते, त्यामुळे मेहनत करणाऱ्या कष्ट घेणाऱ्या डॉक्टरांचा गौरव झालाच पाहिजे काहीजण चुकारपणा करतात. मात्र अशा लोकांमुळे चांगल्या डॉक्टरांवर उगीच चुकीचा शिक्का मारला जाऊ नये अशी अपेक्षा भरणे यांनी व्यक्त केली.

राज्यामध्ये सर्वात अधिक रक्तदान संकलित करणारा इंदापूर तालुका व गोरगरीब कुटुंबांना धान्याचे कीट पुरवणारा इंदापूर तालुका बनला आहे. त्यामुळे सामाजिक जाणिवा जपल्या जातात या गोष्टीचा आनंद तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून कायम राहणार आहे. शहर गाव बंद ठेवणे खूप सोपे आहे मात्र सामान्य व्यापाऱ्यांचा कुटुंबाचा विचार केला तर त्यांच्या चुली चूली पेटण्याचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे कोणीही भुके राहू नये.याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, डॉ.अविनाश पानबुडे,डॉ. नामदेव गार्डे तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष अजिंक्य इजगुडे यांनी मनोगत व्यक्त केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा