मुंबईच्या विकासात मीठाचा खडा टाकू नका; मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचा समाचार

मुंबई, ८ नोव्हेंबर २०२०: ‘मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा मिठागराची आहे असं सांगून प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्रकल्पात कोणीही मीठाचा खडा टाकू नका. मुंबईकरांसाठी कोणत्याही टीकेची पर्वा न करता काम करणार,’ असं सडेतोड उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मागील भाषणात मेट्रो कारशेडबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. आरे ऐवजी मुंबई मेट्रो कारशेड आता कांजूरमार्ग येथील शासकीय जागेवर होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. त्यानंतर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला विरोध केला होतं. असं असतानाच केंद्रानंही आता कारशेडच्या जागेवर आक्षेप घेतला असून ती जागा राज्य सरकारची नसून केंद्राची असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष पाहायला मिळत आहे. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. तर, कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांचा चांगलाच समाचारही घेतला आहे.

‘कांजूरमार्गची जमीन मिठागराची आहे असं काही जणं म्हणतायेत. असे म्हणणाऱ्यांना एक कळत नाही ते मुंबईकरांच्या प्रकल्पांमध्ये मिठाचा खडा टाकत आहे. आरेची कारशेड कांजूरमार्गला नेली त्यावर सर्व उत्तर आपल्याकडे आहेत. हे सर्व टीका करतायेत त्यांना योग्य उत्तर देऊ,’ असा सूचक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

मिठाच्या खड्याचा इलाज काय करायचा तो करु पण, आम्ही सुद्धा डोळे बंद करुन काही काम करत नाही. जे काही मुंबईकरांच्या हिताचे असेल ते टीकेची पर्वा न करता करणारच,’ असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

मेट्रोसाठी जर्मनीच्या के. एफ. डब्ल्यू या कंपनीकडून ५४५ दशलक्ष युरो एवढ्या रकमेचं कर्ज अत्यंत माफक दरात घेतलं आहे. आम्हाला महाराष्ट्र सोयीस्कर वाटतं असं त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. हे राज्याचे व राज्यातील जनतेच्या मेहनतीचं फळ आहे, असंही ते म्हणाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा