मुंबई, ७ एप्रिल २०२१: राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात मुंबई देखील मागे नाही. मात्र, असं असताना आता मुंबईत लसींचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. खुद्द मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे. दरम्यान मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल तर मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा १० हजार पार गेला आहे. तसेच पुढील साठा येईपर्यंत मुंबईत कोरोना लसीचे फक्त १ लाख ८५ हजार डोस शिल्लक आहेत.
राज्य सरकारकडून लसीच्या पुरवठ्याबाबत केंद्राकडे वारंवार विनंती केली जात आहे. पण, केंद्राकडून लस पुरवठा झाला नसल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे मुंबईत कोरोना लसीचे फक्त १ लाख ८५ हजार डोस शिल्लक आहेत. त्यात कोविशिल्डचे १ लाख ७६ हजार ५४०, तर कोवॅक्सिनचे ८ हजार ८४० डोस शिल्लक आहेत. त्यामुळे कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेणाऱ्यांचीही अडचण होण्याची शक्यता आहे.
मुंबईतल्या लसीकरण कार्यक्रमाविषयी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “मुंबईत कोविशिल्ड लसींचे एकूण १ लाख ७६ हजार ५४० डोस शिल्लक आहेत. त्यासोबतच कोवॅक्सिन लसींचे ८ हजार ८४० डोस शिल्लक आहेत. मुंबईत आपण दररोज ५० हजार व्यक्तींना लसीचे डोस देत आहोत. मुंबईतच्या जम्बो कोविड सेंटर्समध्ये दिवसाला दीड ते दोन हजार लसींचे डोस दिले जात आहेत. त्यामुळे येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मुंबईत लसींचा तुटवडा निर्माण होणार आहे”.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे