पुणे, २७ फेब्रुवारी २०२३: अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या गेल्या महिन्यात आलेल्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्सच्या घसरणीची प्रक्रिया थांबलेली नाही. अडचणींनी घेरलेल्या अदानी समूहासोबतच सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एलआयसी) अडचणीही वाढल्या आहेत. हिंडेनबर्ग आणि अदानी वादात एलआयसीला आधीच नुकसान सोसावं लागलंय. यासोबतच शेअर्सही घसरले आहेत. शुक्रवारी बीएसईवर एलआयसीचे शेअर्स एक टक्क्यांहून अधिक घसरून ५८४.७० रुपयांवर बंद झाले. त्याच वेळी, १ फेब्रुवारी रोजी हा स्टॉक ५८२.४५ रुपयांच्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला होता.
एलआयसीच्या शेअर्स मध्ये १७ टक्के घसरण
अदानी समूहाच्या हिंडनबर्गच्या अहवालानंतर एलआयसीचे शेअर १७ टक्क्यांनी घसरले आहेत. त्याच वेळी, या विमा कंपनीचं बाजार भांडवल एका महिन्यात ७५ हजार कोटी रुपयांनी घटलंय. २४ जानेवारी रोजी एलआयसीचे मार्केट कॅप ४,४४,१४१ कोटी रुपये होते. शुक्रवारी ते ३,६९,७९० रुपयांपर्यंत खाली आलं. मात्र, जानेवारीमध्ये एलआयसीने काही नफा कमावल्याचे अदानी समूहाच्या अंतर्गत सूत्रांनी ठामपणे सांगितले आहे. मात्र, विमा कंपनीकडून नफा-तोटाबाबत अद्याप कोणतंही विधान आलेलं नाही.
या कंपन्यांमध्ये गुंतवणूक
एलआयसीने अदानी समूहाच्या जवळपास सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलीय. यामध्ये अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स, दाणी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी यांचा समावेश आहे. बीएसईला दिलेल्या आकडेवारीत एलआयसीने सांगितलं होतं की त्यांची सर्वाधिक गुंतवणूक अदानी पोर्टमध्ये आहे. या कंपनीत त्यांची हिस्सेदारी ९.१ टक्के आहे. त्याच वेळी, सहा कंपन्यांची हिस्सेदारी १.२५ ते ६.५ टक्क्यांपर्यंत आहे.
बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, एलआयसीने गौतम अदानी यांच्या कंपन्यांमध्ये (एलआयसी इन्व्हेस्टमेंट इन अदानी शेअर्स) मोठी गुंतवणूक केलीय. ३१ डिसेंबर २०२२ रोजी विमा कंपनीचे गुंतवणूक मूल्य ८२,९७० कोटी रुपये होते, जे २३ फेब्रुवारी २०२३ रोजी ३३,२४२ कोटी रुपयांवर आले. हिंडेनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर गेल्या एका महिन्यात नुकसान झपाट्याने वाढले आहे.
अदानी समूहाचं मोठं नुकसान
२४ जानेवारी रोजी हिंडेनबर्गने अदानी समूहावरील संशोधन अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये शेअर्स आणि कर्जाच्या फेरफारबाबत मोठे दावे करण्यात आले होते. हा अहवाल आल्यानंतर अदानीच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे अदानी समूहाचं बाजार भांडवल १२ लाख कोटी रुपयांनी कमी झालं आणि ते १०० अब्ज डॉलर च्या खाली पोहोचलं. २५ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू झालेल्या एलआयसीमध्ये गुंतवलेल्या सर्व स्टॉक्समधील घसरण अजूनही सुरूच आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे