सांगली, १८ फेब्रुवारी २०२५ : चंद्रहार पाटील, ज्यांनी दोन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला आहे, त्यांनी कुस्तीच्या प्रतिष्ठेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललय. त्यांनी सांगली येथे लाक्षणिक उपोषण सुरू केले असून ज्यामध्ये त्यांनी ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेच्या आयोजनात एकसूत्रता आणण्याची मागणी केली आहे.
चंद्रहार पाटील यांच्या उपोषणाचे कारण-
सध्या राज्यात एकापेक्षा जास्त ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धांचे आयोजन केले जाते, ज्यामुळे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची लोकप्रियता आणि महत्त्व कमी झाले आहे, असे चंद्रहार पाटील यांचे मत आहे. त्यांची मागणी आहे की, ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा वर्षातून एकदाच आयोजित केली जावी, ज्यामुळे या स्पर्धेची प्रतिष्ठा कायम राहील.
चंद्रहार पाटील यांची भूमिका
चंद्रहार पाटील यांनी यापूर्वीही अनेकवेळा ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेच्या आयोजनातील गोंधळावर आवाज उठवला आहे. त्यांनी या मागणीसाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली आहे. मात्र, त्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे त्यांनी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
उपोषण कुठे आणि कधी ?
चंद्रहार पाटील यांचे उपोषण सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे. त्यांनी आपली मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मागण्या काय आहेत ?
१) महाराष्ट्र केसरी स्पर्धा राज्यात वर्षातून एकदाच आयोजित करण्यात यावी.
२) ‘एक राज्य, एक खेळ, एक संघटना’ ही संकल्पना राज्य शासनाने अमलात आणावी.
३) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या विजेत्याला आयोजकांनी १ कोटी रुपयांचे पारितोषिक द्यावे.
४) तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यावर DYSP पदावर थेट नियुक्ती होते, त्याच धर्तीवर एकदा महाराष्ट्र केसरी झाल्यावर PSI पदावर थेट नियुक्ती मिळावी.
५) पैलवान शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावरील 3 वर्षांची बंदी उठवण्यात यावी.
६) राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या मल्लांची डोपिंग चाचणी अनिवार्य आहे.
चंद्रहार पाटील यांचे उपोषण ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेच्या प्रतिष्ठेसाठी एक महत्त्वाचा लढा आहे. त्यांच्या मागणीला यश मिळते का, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी : साक्षी पांचाळ