शिर्डीत दुहेरी हत्याकांड: साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांचा निर्घृण खून, एक गंभीर जखमी

10

शिर्डी ३ फेब्रुवारी २०२५ : शिर्डी | श्रद्धेच्या नगरीत पहाटेच्या सुमारास दुहेरी हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला असून, नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

हल्ल्याची भीषण मालिका

पहाटेच्या वेळी ड्युटीवर जात असलेल्या साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांवर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला. सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कृष्णा शेजुळ यांचा या भ्याड हल्ल्यात मृत्यू झाला. तसेच कृष्णा देहरस्कर नामक तरुणावरही हल्ला झाला असून, तो गंभीर जखमी आहे. तिघांवर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला झाल्याने हा पूर्वनियोजित कट होता का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

नागरिकांचा संताप, पोलिसांवर टीका

या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात असून, शिर्डीतील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही चर्चा सुरू आहे.

विखे पाटलांची भेट, तातडीच्या कारवाईचा इशारा

माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी रुग्णालयात जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले असून, “दुपारपर्यंत आरोपी ताब्यात असतील,” असा विश्वास व्यक्त केला. तसेच, “हे नियोजित हत्याकांड नसून नशेखोरांचे कृत्य आहे,” असेही ते म्हणाले.

शिर्डीतील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय

साई संस्थान परिसरात सतत वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण शिर्डीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

न्यूज अनकट प्रतिनिधी ; सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा