डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची १०० फुटांनी उंची वाढवणार

मुंबई : मुंबईमधील दादर परिसरातील इंदू मिलमधल्या प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची ही वाढवण्यात येणार आहे. या आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची ही २५० फुट निश्चित करण्यात आली होती. परंतु आता ती वाढवून ३५० फुट होणार आहे.

सरकारने याबाबत नवा प्रस्ताव आणला आहे. तसेच आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत याबाबत चर्चा देखील होणार आहे. उंची वाढवल्यामुळे आता पुतळ्याचा खर्च देखील वाढणार, परिणामी ७०९ कोटींचा खर्च आता ९९० कोटींवर जाणार आहे. तरी या स्मारकाचा पाया हा १०० फुटांचा असेल. तसेच १४ एप्रिल २०२० पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण होणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्र्यांनी केला असला तरी तरी स्मारकाची अद्यापही एक वीट देखील रचली गेलेली नाही.
मुंबई मधील इंदू मिलमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची पाहणी ही २ जानेवारी रोजी अजित पवार यांनी केली. त्यानंतरच्या झालेल्या पत्रकार परिषदेत स्मारकाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून या महिन्यात सर्व परवानग्या मिळवून देणार असल्याचे सांगितले. तसेच सर्व अडचणी दूर करून स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही म्हटले.
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे १२५ एकर जागा असलेल्या परिसरात उभे करण्यात येणार आहे. २०११ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याची घोषणा केली. त्यानंतर युतीच्या सरकारने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून सर्व परवानग्या मिळवल्या.
बिहार निवडणुकीआधी ऑक्टोबर २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदू मिल येथे आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. या स्मारकाच्या आराखड्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असेल.
तसेच लायब्ररी, आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके, ग्रंथ, भिक्खू निवासस्थान, विपश्यना सभागृह, पार्कींग, म्युझियम इत्यादींचा या आराखड्यात समावेश आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा