डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधन आता थेट मलेशिया विद्यापीठात

चंद्रपूर , ३ मार्च २०२३ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर जगभरातील विविध भाषांतील उपलब्ध ग्रंथसाहित्याचे आकलन करून त्याआधारे विपुल प्रमाणात विविध विषयांवर ग्रंथसंपदा उपलब्ध करून ठेवलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य हा खऱ्या अर्थाने वैश्विक ठेवा आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या मानवतावादी आणि अनेक आंतराष्ट्रीय समस्यांची सोपेपणाने उकल करणारी ग्रंथसंपदा ही जागतिक स्तरावर अनेक विद्यापीठांतील अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाणार आहे.

मलेशिया अतिशय प्रगत देश असल्याने या देशात विद्यापीठातील अभ्यासक्रमात डॉ. बाबासाहेबांच्या साहित्यसंपदेचा समावेश व्हावा, ही अनेक आंबेडकरी अनुयायांची इच्छा होती. या वर्षाचे जागतिक आंबेडकरी संमेलन मलेशियाची राजधानी क्वाललंपूर येथे नुकतेच पार पडले. त्यानिमित्ताने चिमूर येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. भूपेश पाटील यांनी मलेशिया देशाच्या केंद्रीय सहकार व उद्योग राज्यमंत्री सरसती कंडासामी, भारतीय दूतावासातील राजदूत व उच्च अधिकारी रम्या हिरानय्या; तसेच मलेशियन औद्योगिक व व्यापार संघटनेचे उपाध्यक्ष एस. एम. गोबल यांची भेट घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा अध्यासन सुरू करण्याबाबत; तसेच बाबासाहेबांची जयंती ही मलेशिया देशात शासकीय स्तरावर साजरी करण्याबाबत निवेदन देऊन याबाबत सादरीकरण केले. मलेशिया येथील केंद्रीय सहकार व उद्योग राज्यमंत्री सरसती कंडासामी हे स्वतः बाबासाहेबांच्या साहित्याचे अभ्यासक आहेत. हा विषय येत्या कॅबिनेट बैठकीत सादर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

त्यामुळे लवकरच आता बाबासाहेबांचे वैचारिक साहित्य मलेशिया देशाच्या विद्यापीठातील अभ्यासक्रमात शिकविले जाईल. यामध्ये चिमूरच्या क्रांती भूमीचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते डॉ. भूपेश पाटील यांनी पुढाकार घेतल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा