डॉ. हर्षवर्धन यांनी कोबास ६८०० चाचणी मशीनचे केले लोकार्पण

8

नवी दिल्ली, दि. १५ मे २०२०: केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राला (एनसीडीसी) भेट दिली आणि कोबास ६८०० चाचणी मशीनचे लोकार्पण केले. कोविड-१९ प्रकरणांच्या तपासणीसाठी सरकारने खरेदी केलेली ही पहिलीच चाचणी मशीन असून ती राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रात स्थापन केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी एनसीडीसीचे संचालक डॉ. एस के सिंह आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नियंत्रण कक्ष आणि चाचणी प्रयोगशाळांना देखील भेट दिली आणि कोविड-१९ चाचणीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. चाचणी क्षमता वाढविण्याच्या कामगिरीवर प्रकाश टाकताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, “आपण आता दररोज एक लक्ष चाचण्या घेण्याची क्षमता विकसित केली आहे. देशातील ३५९ सरकारी प्रयोगशाळा आणि १४५ खाजगी प्रयोगशाळांसह ५०० हून अधिक प्रयोगशाळांमध्ये कोविड-१९ च्या सुमारे २० लाख चाचण्या पूर्ण करून आज आपण एक महत्वाच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत”. ते पुढे म्हणाले की, “एनसीडीसी आता, देशसेवा करण्यात कोविड-१९ ची अचूक पीसीआर चाचणी करण्यासाठी संपूर्णतः स्वयंचलित, कोबास ६८०० मशीनने सुसज्ज आहे. कोबास ६८०० चोवीस तासात सुमारे १२०० नमुन्यांची निर्धारित कालावधीसह दर्जात्मक, उच्च परिणाम चाचणी प्रदान करेल. यामध्ये विलंब कमी झाल्यामुळे चाचणी क्षमता वाढेल.”

त्यांची इतर वैशिष्ट्ये अधोरेखित करताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, कोबास ६८०० हे एक अत्याधुनिक मशीन आहे जे रोबोटिक्सने सक्षम असल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता कमी होते तसेच ही मशीन मर्यादित मानवी हस्तक्षेपाने चालवण्यात येत असल्यामुळे आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना होणारा संसर्गाचा धोकाही कमी संभवतो. चाचणीसाठी मशीनला किमान BSL२+ नियंत्रणाची आवश्यकता असल्याने हे मशीन कोणत्याही सुविधा केंद्रात स्थापित केले जाऊ शकत नाही. कोबास ६८०० इतर व्हायरल हिपॅटायटीस बी आणि सी, एचआयव्ही, एमटीबी (रिफाम्पिसिन आणि आयसोनियाझाइड प्रतिरोध दोन्ही), पॅपिलोमा, सीएमव्ही, क्लॅमिडीया, निझेरिया इत्यादि सारख्या इतर रोगजनकांना देखील शोधू शकतो.

महामारीच्या सुरवातीपासूनच दिल्या जाणाऱ्या निस्वार्थ सेवांबद्दल मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, “मी रोगनिदान तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैज्ञानिक आणि इतर कर्मचारी जे आमचे कोरोना योद्धे आहेत त्यांना अभिवादन करतो जे आमच्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आपले कर्तव्य बजावताना अत्यंत धोकादायक परिस्थितीत दिवस रात्र काम करत आहेत.” ते पुढे म्हणाले की, देशाने या आघाडीच्या आरोग्यसेवा प्रदात्यांना वाळीत न टाकता त्याच्या योगदानासह त्यांचे कौतुक केले पाहिजे.

डॉ. हर्षवर्धन यांनी निगराणी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या समर्पित वृत्तीचे, कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाचे कौतुक केले आणि नवीन जोमाने लढा सुरु ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सामुदायिक निरीक्षण ठेवणे आणि संपर्क साधण्याची गुणवत्ता आणि स्थिरता यावर जोर दिला. “ही काळाची गरज आहे की जे लोक एकतर घरात किंवा विलगीकरण कक्षात राहत आहेत त्यांनी कठोर दक्षता बाळगणे आवश्यक आहे तसेच सामाजिक अंतर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा नियमित आढावा घेतला पाहिजे. वृद्ध, गर्भवती महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे”, असे ते म्हणाले.

डॉ हर्षवर्धन पुढे म्हणाले की, ही एक आनंददायक बातमी आहे की मागील तीन दिवसात विषाणूचा प्रादुर्भाव दुप्पट होण्याचा काळ वाढून १३.९ दिवसांवर गेला आहे, तर मागील १४ दिवसातील दुप्पट होण्याची वेळ ११.१ होता. ते पुढे म्हणाले की मृत्यूचे प्रमाण ३.२ टक्के आहे आणि रोग्यांच्या बऱ्या होण्याच्या प्रमाणात सुधरणा झाली असून आज हा दर ३३.६ आहे (काल हा आकडा ३२.८३ टक्के होता). त्यांनी असेही सांगितले की (कालपर्यंत) आयसीयूमध्ये  सक्रिय कोविड -१९ चे ३.० टक्के रुग्ण, व्हेंटिलेटरवर २.७ टक्के आणि ऑक्सिजनवर २.७ टक्के रुग्ण आहेत. “आज अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, मणिपूर, मेघालय, मिझोरम, पुडुचेरी, तेलंगणा अशी १४ राज्ये / केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे गेल्या २४ तासांत कोविड-१९ च्या कोणत्याही प्रकरणाची नोंद झाली नाही. तसेच, दमण आणि दीव, सिक्कीम, नागालँड आणि लक्षद्वीपमध्ये अद्याप एकही प्रकरणाची नोंद नाही, ”असे त्यांनी नमूद केले.

१४ मे २०२० पर्यंत देशात एकूण ७८,००३ प्रकरणांची नोंद झाली असून त्यातील २६,२३५ लोक बरे झाले आहेत आणि २,५४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ३,७२२ नवीन प्रकरणांची पुष्टी झाली आहे असे त्यांनी नमूद केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी