पुणे : ज्येष्ठ रंगकर्मी, विचारवंत डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावरवर पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत शुक्रवारी (दि.२०) रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार मंत्री सुभाष देसाई यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी नाट्य, सिनेमा, साहित्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह डॉ. लागू यांच्या चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्याच्या पत्नी डॉ. दीपा लागू, पुत्र डॉ. आनंद लागू, बंधू विजय लागू यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
तसेच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी देखील यावेळी लागू यांचे अंत्यदर्शन घेतले.
डॉ. लागू यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आणल्यानंतर पोलिसांच्या पथकाने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून डॉ. लागू यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, उपमहापौर सरस्वती शेंडगे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, सह-पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पुणे शहरचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) अमृत नाटेकर, नाट्य व चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, नाना पाटेकर, विजय केंकरे, राहुल सोलापूरकर, माधव वझे, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत कुलकर्णी , नंदू माधव, सुधीर गाडगीळ, प्रसाद कांबळी, मेघराज भोसले, सुनील महाजन, पर्ण पेठे, ज्योती सुभाष, विवेक लागू यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.