भोसे करकंबची डॉ.नम्रता तळेकर करतेय कोव्हीड रुग्णांची अविरत सेवा

माढा, २९ सप्टेंबर २०२० : संपूर्ण जगामध्ये कोरोना प्रादुर्भावाने थैमान घातले असताना देशातील वैद्यकीय सेवा अपुरी पडताना दिसत आहे. अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी कोरोनाग्रस्तांवर भीतीपोटी उपचार करण्यास टाळाटाळ करत होते याचेही चित्र पाहायला मिळत होते. मात्र याला अपवाद ठरली सोलापूर जिल्ह्यातील भोसे करकंबची नम्रता जयवंत तळेकर.

 

नम्रता सध्या लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज सायन मुंबई येथे एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. कोविड रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने डॉक्टरांची गरज निर्माण झाली होती. सायन हॉस्पिटल मुंबईच्या वतीने शिकाऊ डॉक्टरांना रुग्णसेवेसाठी बोलवण्यात आले होते. अशावेळी कोरोनाची प्रचंड भीती असल्यामुळे नम्रताच्या कुटुंबीय तिला कोविड ड्युटी करण्यास प्रचंड विरोध करत होते. परंतु आपण या देशाचं काहीतरी देणे लागतो या महामारीला तोंड देण्यासाठी आपण देशसेवेसाठी उतरले पाहिजे असे नम्रताला सातत्याने वाटत होते.

नम्रताचे वडील जयवंत तळेकर हे आर्मी ऑफिसर होते. लहानपणापासूनच वडिलांकडून देश सेवेची प्रेरणा मिळाली असं ती सांगते. लॉकडाउनच्या काळात परिवहन सेवा पूर्णपणे बंद होती. त्यामुळे मिळेल त्या गाडीने काहीही करून सायन हॉस्पिटलला पोहचायचे असे तीने ठरवून तरकारी वाहनाने ती मुंबईला गेली. बीएमसी मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून रुजू झाली. ड्युटी करत ती मालाड थर्मल स्क्रीनिंग कॅम्पमध्ये सहभागी झाली. त्यानंतर बीकेसी जम्बो कोविड सेंटर हॉस्पिटलला ती मेडिकल ऑफिसर म्हणून काम पाहत आहे. गेल्या चार महिन्यांपासून ती आठ तासांची ड्युटी असतानाही दहा ते बारा तास कोविडग्रस्तांसाठी अविरत काम करत आहे.

 

ड्युटी करत असताना एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा अभ्यास, ऑनलाईन लेक्चर्स ही करत आहे. कोवीड रुग्णांवर केलेल्या सेवेमुळे रुग्ण बरे होऊन घरी परतताना जे आभार व्यक्त करतात त्याचे खूप समाधान मिळते असे ती सांगते. ग्रामीण भागातील मुलगी रुग्णसेवेसाठी स्वतःला वाहून घेते ही अभिमानाची गोष्ट आहे. नम्रताच्या या धाडसी कर्तव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा