पुणे, १४ सप्टेंबर २०२३ : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणात, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने विशेष न्यायाधीश पी.पी.जाधव यांच्या न्यायालयात नरेंद्र दाभोलकर खटल्यातील साक्षी पुरावे संपल्याबाबतचा अर्ज दाखल केला. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा २० ऑगस्ट २०१३ मध्ये गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. याप्रकरणात पुणे पोलीस, एटीएसनंतर तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता.
दरम्यान याप्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड.संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक होऊन त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. याप्रकरणात सीबीआयने मुख्य आरोपपत्रासह पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. यात सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षी पुरावे संपल्याची माहिती सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सुर्यवंशी यांनी न्यायालयात अर्ज दाखल करुन दिली.
आता या प्रकरणात आरोपीचे जबाब नोंदविले जाणार असून, त्यानंतर बचाव पक्षाला साक्षीदार सादर करता येतील. या प्रकरणांची पुढील सुनावणी १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. असं सांगण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर