डॉ. विनिता आपटे यांना ‘ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड’

पुणे ४ सप्टेंबर २०२४ : पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक अध्यक्ष डॉ.विनिता आपटे यांना इंडॉ-स्कँडिक ऑर्गनायझेशनचा ‘ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड’ हा पुरस्कार मिळाला आहे. नुकताच हा पुरस्कार बाल्टिक वॉटर कॉन्फरन्स (हेलसिंकी) येथे इंडो-स्कँडिक ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष सुरेश पांडे यांच्या हस्ते देण्यात आला. इंडो-स्कँडिक ऑर्गनायझेशन ही संस्था भारतीय संस्कृती व पर्यावरण विषयक विशेष काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव व्हावा यासाठी विविध उपक्रम राबवत असते. पुरस्कार देताना इंडो-स्कँडिकचे अध्यक्ष सुरेश पांडे म्हणाले, डॉ.विनिता आपटे गेली दोन दशके पर्यावरण जागृती व संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत आहेत. भारताच्या बाहेरील स्वयंसेवी संस्थांना दिशा देण्याचं काम करणे ,अनेक संस्थांबरोबर उपक्रम राबवणे यासाठी हा पुरस्कार त्यांना देताना अतिशय आनंद वाटतो.

पर्यावरणाच्या प्रश्नांबाबत असलेल्या जिव्हाळ्यातून डॉ. विनिता आपटे यांनी तेर (टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, रिसर्च, रिहॅबिलिटेशन फॉर द एन्व्हॉयर्नमेंट) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. पॅरिसमध्ये युनायटेड नेशन्स एनव्हॉयर्नमेंटमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतरही ते काम पूर्ण झाल्यानंतर भारतात येऊन पर्यावरण क्षेत्रात त्यांनी आपले काम सुरू ठेवले. गेल्या ७ वर्षांमध्ये त्यांनी पाच लाखापेक्षा जास्त झाडे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजराथ, राजस्थान, हरयाणा, तामिळनाडू इत्यादी ठिकाणी लावत त्यांचे जतन करून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याचे काम केले आहे. २१ ठिकाणी जंगले तयार केली आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर लखनौ, मोरादाबाद, सानंद, कर्नाटक ,चेन्नई या शहरांचा समावेश आहे. मुंबई, चेन्नईच्या किनाऱ्यांवर २ लाखापेक्षा जास्त मॅन्ग्रूव्ह प्लांटेशन करून तिथल्या महिलांना रोजगार मिळवून दिला.

डॉ.आपटे यांनी राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन पर्यावरणीय प्रश्नमंजुषा स्पर्धां आयोजनात पुढाकार घेतला आहे. या स्पर्धेने २.३ कोटी विद्यार्थ्यांपर्यंत जागृती केली आहे. तेर ऑलिंपियाडमध्ये १२ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले असुन डॉ.अब्दुल कलाम फेलोशिपने गेल्या पाच वर्षांत ६००० हून अधिक अर्ज प्राप्त केले आहेत. ज्यामध्ये जवळपास ५० अर्जदारांना फेलोशिप मिळाली आहे. ‘तेर एनव्हायरोथॉन’ ही जनजागृती दौड गेली ३ वर्षे आयोजित केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : जयश्री बोकील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा