डॉ. आंबेडकर वसाहतीचे काम लवकर सुरू करावे

बारामती, दि. ७ जुलै २०२०: बारामती शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीच्या जागेवर प्ले ग्राऊंडचे आरक्षण असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना राहण्यासाठी प्ले ग्राऊंड ऐवजी रहिवाशी वसाहत होणार असल्याचे सांगत हे राज्यातील पहिलेच उदाहरण असावे असे सांगितले. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेला नवीन घराचे आश्वासन दिले होते. त्यासाठी अजित पवार यांनी प्ले ग्राऊंडचे आरक्षण असणाऱ्या जागेवर गरीब व दुर्बल घटकांना पक्के घर मिळावे यासाठी पुढाकार घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश बारामती नगर परिषदेला दिले आहेत.

बारामती शहरातील आमराई भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत ही १९८० साली बांधण्यात आली होती. या दुमजली इमारती मध्ये ९६ कुटुंबे वास्तव्यास होती. मात्र काही वर्षातच ही इमारत राहण्यास धोकादायक झाली होती. यासाठी बारामती नगर परिषदेने येथील कुटुंबांना घरे खाली करण्याच्या सूचना केल्या होत्या.

परंतु आपले घर जाईल,अशी भीती रहिवाश्यांना होती. मात्र येथील स्थानिक नगरसेवकांनी राहिवाश्यांच्या मनातील ही भीती काढून टाकत त्यांना विश्वासात घेत या मोडकळीस आलेल्या इमारतीची भविष्यातील धोक्याची कल्पना दिली. बारामती नगरपरिषदेने जळोची येथे या ९६ कुटुंबांची पत्राशेड उभारून तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली आहे. आता डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहतीच्या कामाला सुरुवात होत असून येथील गरीब व दुर्बल कुटुंबांना स्वतःची हक्काची घरे मिळणे शक्य होणार आहे. या वसाहतीच्या जागेवर खेळाच्या मैदानाचे आरक्षण पडले होते. ते आरक्षण रद्द करण्यासाठी पालिका प्रशासनाने ठराव केला होता. याकामी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी राज्यात युती सरकार असतानाही आरक्षण उठविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता शासनाकडे आरक्षण रद्द करण्यासाठी सतत पाठपुरावा केला होता. सहा महिन्यात प्ले ग्राऊंडचे आरक्षण उठविले गेले. यासाठी किरण गुजर यांच्या अनुभवाचा मोठा फायदा झाल्याने येथील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. स्थानिक नगरसेवक बिरजू मांढरे यांनीही या कामात किरण गुजर यांना सतत पाठपुरावा करत मदत केली आहे.

आरक्षण रद्द झाल्यावर आता येथे पंतप्रधान आवास योजनेतून ४०० स्केवर फुटांची ९६ घरे उभारणार आहेत. या घरात संडास, बाथरूम, किचन, बेडरूम व हॉल असणार आहे. तसेच वसाहत पाडत असताना शेजारील घरांना झालेल्या नुकसान देखील दुरुस्त करून देणार आहेत तसेच डॉ. आंबेडकर वसाहतीनंतर पुढील टप्प्यात साळवेनगर येथे पंतप्रधान आवास योजनेतून याच पद्धतीची घर बांधली जाणार आहेत. वसाहतीच्या मनात जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करत संपूर्ण वेळ दिला आहे.असे माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक बिरजू मांढरे यांनी सांगितले.

बारामती नगर पालिका निवडणुकीवेळी शहरातली डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत परत उभी करणार असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्याप्रमाणे पवार यांनी सर्व सहकार्य केले व आता या इमारतीचे काम मार्गी लागत असल्याचे समाधान असल्याचे जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा