नवी दिल्ली, 24 मार्च 2022: संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने बुधवारी अंदमान आणि निकोबार बेटांवर जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. क्षेपणास्त्र चाचणी पाहण्यासाठी एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि इतर संरक्षण अधिकारी उपस्थित होते. क्षेपणास्त्राने आपल्या लक्ष्यावर अचूक मारा केल्याची माहिती संरक्षण अधिकाऱ्याने दिली.
एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल अभिनंदन केले. ऑपरेशनल तयारीचा आढावा घेण्यासाठी ते अंदमान आणि निकोबार बेटावर आहेत.
यापूर्वी, 8 डिसेंबर 2021 रोजी, ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या हवाई आवृत्तीची हवाई दलाच्या लढाऊ विमान सुखोई-30MK-1 मध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. निर्धारित मानकांची पूर्तता करून क्षेपणास्त्राने शत्रूचे लपण्याचे ठिकाण नष्ट केले. सुखोई-30 एमके-1 फायटर जेटमध्ये बसवण्यात आलेले ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी विकसित करण्यात आले आहे.
दुसरीकडे, भारतीय हवाई दलासाठी ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राची अपग्रेडेड एअर लॉन्च आवृत्ती तयार केली जात आहे. त्याची रेंज 800 किमी असेल. म्हणजेच आपली लढाऊ विमाने हवेत असताना एवढ्या दूरवरून शत्रूचे स्थान नष्ट करू शकतात.
भारत आता रणनीती क्षेपणास्त्रांची श्रेणी सातत्याने वाढवत आहे. फक्त एका सॉफ्टवेअर अपग्रेडसह, क्षेपणास्त्राची श्रेणी 500 किमीने वाढते. ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे भारतीय हवाई दलाच्या 40 सुखोई-30 MKI लढाऊ विमानांवर तैनात करण्यात आली आहेत. ही क्षेपणास्त्रे अत्यंत अचूक आणि शक्तिशाली असून शत्रूच्या तळांना पूर्णपणे नष्ट करू शकतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे