पुणे, १५ ऑक्टोबर २०२२ : पावसाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला काही दिवस पावसाने ओढ दिली. जुलै महिन्यापासून सुरू झालेला पाऊस आता परतीच्या वाटेवर आहे. पुण्यासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे.
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एफसी रोडवर पाणी साचल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत मुंबई आणि उपनगरात पाणी साचल्याच्या बातम्या येत होत्या. यावर्षीच्या पावसाने मात्र पुण्यातही ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना पाहायला मिळाल्या.
दिवसभराच्या उकाड्या नंतर दुपारी तीनच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची त्रेधात्रीपाट उडाली. सायंकाळी ऑफिस संपल्यावर कामगार वर्गाचे चांगलेच हाल झालेले पहावयास मिळाले. पावसाने मध्ये उसंत घेतल्यानंतर रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, दौंड आणि इंदापूर भागात पावसाची संततधार सुरू होती. पुरंदर तालुक्याच्या प्रवेशद्वारावर पुणे- पंढरपूर रस्त्यावरील दिवेघाटात ढगफुटी सदृश पाऊस झाला. यामुळे घाटातील रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर