मुंबई, १८ ऑक्टोंबर २०२३ : मुंबई पोलिसांनी ड्रग माफिया ललित पाटीलला अटक केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी त्याला चेन्नई येथून अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांना चकमा देऊन पुण्यातील रुग्णालयातून तो फरार झाला होता आणि तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.
विशेष म्हणजे ४ ऑगस्ट रोजी मुंबईत ३०० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या जप्तीदरम्यान फरार झालेल्या दोन मोठ्या ड्रग्ज विक्रेत्यांना, उत्तर प्रदेश एसटीएफ आणि महाराष्ट्र गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने १० ऑक्टोबर रोजी बाराबंकी येथे अटक केली होती. त्यापैकी एक महाराष्ट्रातील सर्वात मोठा ड्रग माफिया ललित पाटील याचा धाकटा भाऊ होता, तर दुसरा त्याच्या ड्रग व्यवसायाचा व्यवस्थापक होता. हे दोघेही नेपाळला पळून जाण्याच्या बेतात होते. २ ऑगस्ट रोजी याच लोकांनी ललित पाटीलला महाराष्ट्रातून पोलिसांच्या ताब्यातून पळवून लावले होते.
२०२० मध्ये ललित पाटीलला अटक केल्यानंतर ललितच्या सूचनेवरून त्याचा भाऊ भूषण अनिल पाटील आणि व्यवस्थापक अभिषेक बिलास बलकवडे यांनी संपूर्ण टोळीची सूत्रे हाती घेतली होती. दरम्यान, ४ ऑगस्ट रोजी मुंबईत १५० किलो एमडी ड्रग जप्त करण्यात आले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड