समुद्रातून अमली पदार्थांची तस्करी, गुजरातच्या बंदरांवर सातत्यानं पकडले जात आहे ड्रग्स, पहा लिस्ट

गुजरात, 3 मे 2022: गुजरातमध्ये एका आठवड्यात 350 किलोहून अधिक हेरॉईन जप्त करण्यात आलंय. त्याचं बाजारमूल्य 2 हजार कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. 28 एप्रिल रोजीच तपास यंत्रणांनी 90 किलो हेरॉईन पकडलं होतं. 9,760 किलो धाग्याच्या कन्साइनमेंटसह ते कव्हरखाली आणलं जात होतं. गुजरातमधील पिपावाव बंदरात हे हेरॉईन पकडण्यात आलंय.

गुजरातचे पोलिस डीजीपी आशिष भाटिया यांनी सांगितलं की, 5 महिन्यांपूर्वी इराणमधून धागे असलेला कंटेनर पिपावाव बंदरात आला होता. यामध्ये 395 किलो वजनाच्या 4 संशयास्पद पिशव्या सापडल्या. त्याची चौकशी केली असता, त्यात सुमारे 90 किलो हेरॉईन आढळून आलं. बाजारात त्याची किंमत सुमारे 450 कोटी रुपये आहे.

डीजीपी भाटिया यांनी सांगितलं की, ड्रग माफियांनी तपास अधिकाऱ्यांना चकमा देण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबली होती. हे धागे त्याने हेरॉईन असलेल्या द्रावणात भिजवले, नंतर ते वाळवले आणि नंतर पॅक केले.

गुजरातमध्ये अलीकडेच हजारो किलो ड्रग्ज पकडण्यात आले आहेत. त्यावरून राजकारणही तीव्र झालंय. पिपावाव बंदरात पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणी काँग्रेसने प्रश्न उपस्थित केलाय की, गुजरात ड्रग्ज कार्टेलचे केंद्र का बनत आहे?

नऊ महिन्यांत गुजरातमध्ये पकडले गेलेले ड्रग्ज

25 एप्रिल : गुजरातमधील कच्छमध्ये भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानी बोट पकडली. त्यांच्याकडून 56 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं, ज्याची बाजारातील किंमत 280 कोटी रुपये आहे. ही बोट कराचीमार्गे गुजरात किनार्‍यावर पोहोचली. याप्रकरणी 9 पाकिस्तानींना अटक करण्यात आली होती.

25 एप्रिल: महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) कांडला बंदरातून 1,439 कोटी रुपयांचं 205.6 किलो हेरॉईन पकडलं. इराणमधून आलेल्या 17 कंटेनरपैकी एका कंटेनरमधून हे हेरॉईन जप्त करण्यात आलं. गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हे कंटेनर आले होते. याप्रकरणी पंजाबमधून एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, त्याने हा माल इराणमधून मागवला होता.

21 एप्रिल: गुजरात दहशतवादविरोधी पथक आणि डीआरआयने संयुक्त कारवाईत कांडला बंदरातून 200 किलो हेरॉईन पकडलं. त्याची किंमत अंदाजे 1,300 कोटी रुपये होती.

13 सप्टेंबर : गुजरातमधील मुंद्रा बंदरातून गेल्या वर्षी 2,988 किलो किमतीचे हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं. हे हेरॉईन दोन कंटेनरमधून सापडले असून, त्याची किंमत 21 हजार कोटी रुपये आहे. याप्रकरणी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले असून त्यात काही लोकांना अटकही करण्यात आलीय. याचा तपास एनआयए करत आहे.

सागरी मार्गाने अमली पदार्थांची तस्करी वाढली

सागरी मार्गाने अमली पदार्थांची तस्करी वाढत आहे. या वर्षी 8 फेब्रुवारी रोजी लोकसभेत सरकारने तीन वर्षांत सागरी मार्गाने जप्त केलेल्या अमली पदार्थांची माहिती दिली. सरकारच्या उत्तरानुसार, 2019 मध्ये अंदमान-निकोबारमधून 1,156 किलो मेथॅम्फेटामाइन आणि कोलकाता येथून 252 किलो मेथॅम्फेटामाइन, 110 किलो केटामाइन आणि 9.5 किलो एटीएस-केटामाइन जप्त करण्यात आलं.

त्याचप्रमाणे 2020 मध्ये तामिळनाडूमधील तुतीकोरीन येथून 96 किलो हेरॉईन आणि 18.3 किलो एटीएस जप्त करण्यात आलं होतं. तर 2021 मध्ये केरळमधील तिरुवनंतपुरम येथून मार्चमध्ये 300 किलो आणि एप्रिलमध्ये 337 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं. ही सर्व ड्रग्स नौदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी पकडली होती, जी नंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या ताब्यात देण्यात आली होती.

खटले वाढले, अटक वाढली, पण मोजक्याच लोकांना शिक्षा

भारतात अमली पदार्थांच्या तस्करीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 2019 मध्ये, अंमली पदार्थांच्या तस्करीचे 387 गुन्हे दाखल झाले, ज्यामध्ये 781 लोकांना अटक करण्यात आली. त्यापैकी केवळ 129 जणांवरच गुन्हा सिद्ध होऊ शकला.

2020 मध्ये, 416 प्रकरणे नोंदवण्यात आली, ज्यामध्ये 817 अटक करण्यात आली, तर केवळ 42 लोकांना शिक्षा झाली. त्याचप्रमाणं 2021 मध्ये 693 गुन्हे दाखल करण्यात आले असून 1,259 लोकांना अटक करण्यात आलीय. त्यापैकी केवळ 77 जणांना शिक्षा होऊ शकली.

त्याच वेळी, गुजरातबद्दल बोलायचं तर, 2019 ते 2021 या तीन वर्षांत येथे 51 प्रकरणं नोंदवण्यात आली. त्यापैकी 104 जणांना अटक करण्यात आली, तर केवळ 14 जणांना शिक्षा होऊ शकली.

दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद… ठिकाणाहून ड्रग्ज पकडले जात आहेत

तपास यंत्रणांनी या वर्षाच्या अवघ्या 4 महिन्यांत देशाच्या विविध भागातून अनेक किलो ड्रग्ज आणि हेरॉईन पकडलं आहेत. फेब्रुवारीमध्ये दिल्लीच्या तुघलकाबाद कंटेनर डेपोतून 34.7 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं. ते रॉक मिठाच्या कंटेनरमध्ये ठेवलं होतं. मार्चमध्येही याच कंटेनर डेपोतून डाळिंबाच्या रसाच्या खेपात लपवून ठेवलेले २.४ किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं.

मार्चमध्ये, डीआरआयने कोलकाता विमानतळावर तीन प्रवाशांकडून 16 किलो हेरॉईन जप्त केलं होतं. हे हेरॉईन बॅगेत लपवून आणलं जात होतं. अलीकडेच अहमदाबादमधून तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 4.4 किलो, 5.9 किलो आणि ८.४ किलो हेरॉईन जप्त करण्यात आलंय.

याशिवाय दिल्लीतील तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 2.2 किलो, 1.7 किलो आणि 2.25 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलंय. हैदराबादमध्ये 3.2 किलो हेरॉईन पकडण्यात आलं. त्याचवेळी चेन्नईतही दोन वेगवेगळ्या प्रकरणात 12 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा