दुचाकी चोराला मंचर पोलिसांनी पकडले ;पाच मोटरसायकल जप्त

मंचर: लोणी (ता.आंबेगाव) येथून गाडी चोरणारा साहिल सलीम शेख( वय १९ रा. वडगावपीर यास मंचर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एकूण पाच मोटरसायकल जप्त केले आहेत.
१९ जानेवारी रोजी पोलीस नाईक विलास साबळे, योगेश रोडे, एमडी भालेकर पेट्रोलिंग करत असताना अवसरी फाट्याजवळ रात्री साडेनऊ वाजता दुचाकीस्वार दिसला. त्याला हटकले असता, तो गोंधळून गेल्याने पोलिसांचा संशय वाढला. त्याच्याकडून अधिक माहिती काढली असता सदर वाहन हे चोरीचे असल्याचे त्याने कबूल केले.
साहिल सलीम शेख असे नाव त्याने सांगितले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. घोडेगाव कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल लाड, विलास साबळे, प्रशांत भुजबळ, सोमनाथ वाफगावकर, योगेश रोडे, एमडी भालेकर, नीलेश खैरे, विठ्ठल वाघ, कृष्णा पाबळे यांच्या पथकाने सदर आरोपीकडून आणखीन चार मोटरसायकल वडगावपीर येथून जप्त केले आहेत. आणखीन एक फोर व्हीलर मिळण्याची शक्यता असल्याचे लाड यांनी सांगितले. आरोपीने पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहने चोरली असल्याने यातून मोठ्या प्रमाणावर वाहन चोरी टोळी चा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा