पर्यावरणाच्या ऱ्हासा मुळे नद्या फाटल्या, नदीकाठच्या गावांत पूर परिस्थिती

पुणे, १८ ऑक्टोंबर २०२२: पावसाळ्यातील पुराचे पाणी नदीपात्र ओलांडून बाहेर पसरण्याच्या अनुभव आपण सध्या घेत आहोत. पूर्वी नद्यांना पूर आला, तरी त्याचे पाणी पात्रातूनच वाहायचे. परंतु हल्ली पुराचे पाणी नद्यांचे पात्र सोडून बाहेर येताना दिसते. तेव्हा अशा घटनांमुळे होणारी जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याचा विचार करणे आवश्यक ठरते आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे, तर पश्चिम घाटाच्या म्हणजेच, सह्याद्रीच्या कुशीतून सुरू होणाऱ्या पश्चिमवाहिनी किंवा पूर्ववाहिनी अशा दोन्ही प्रकारच्या नद्यांच्या बाबतीत या घटना वारंवार होत आहेत. याच्या परिणामस्वरूप काही वर्षांपासून कोकणात महाड, चिपळूण शहरात, तर पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत अनेक गावांमध्ये पुराचे पाणी घुसत आहे.

संशोधकांच्या मते पावसाळ्यात नद्यांना पूर आल्यावर पुराचे पाणी नद्यांच्या पात्रातून बाहेर पडून आजुबाजूच्या प्रदेशात पसरण्याच्या घटना हल्ली वारंवार होताना दिसत आहेत. नद्यांची पात्रे गाळामुळे भरली जाऊन ही पात्रे उथळ झाल्यामुळे हे असे होत असावे, या कारणांचा शोध घेतला असता, नद्यांच्या पाणलोट क्षेत्रांमधून दगड-गोटे व प्रामुख्याने माती वाहून येत असल्यामुळे असे होत आहे, हे स्पष्ट झाले आहे. पाणलोट क्षेत्रातील जमिनीतून अशाप्रकारे माती वाहून जाण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे, नदीच्या पाणलोट क्षेत्रातील जंगलांची कटाई, पाणलोट क्षेत्रातील जमिनींवर लागलेले वणवे, जमिनीची खोदाई, खाणकाम आणि जमिनीचे सपाटीकरण. अशाप्रकारे पाणलोट क्षेत्रातील मोकळी झालेली माती पुराच्या प्रवाहाबरोबर वाहून खाली येते आणि नदीचा वेग कमी झाल्यावर नदीपात्रात स्थिरावते. या ठिकाणी नदीपात्र उथळ होऊन नदीच्या पात्राची पुराचे पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होते. नदीच्या मुखाजवळ तर ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात घडते.

भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी करावयाची कृती, संशोधक,तज्ञ मंडळींनी सांगितली. नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात जमिनींवर वृक्षलागवड करून झाडोरा वाढवणे, त्याचे जतन व अनुषंगाने मृदासंधारण व्यवस्थित प्रकारे होईल याची काळजी घेणे. तसेच नदीच्या पाणलोट क्षेत्रातून कोणत्याही प्रकारे माती मोकळी होईल, अशा प्रकारची कृत्ये म्हणजे खाणकाम, जमिनी अनावश्यक किंवा चुकीच्या कारणासाठी खणणे, जमिनीचे सपाटीकरण यांवर संपूर्णपणे बंदी आणावी लागेल. तसेच नदीच्या मुखाजवळ जमा झालेला गाळ काढून नदीचे मुख विस्तृत करणे. त्याचप्रमाणे नदीच्या संपूर्ण पात्राचा अभ्यास करून पूर्वी ज्या ज्या ठिकाणी पात्र विस्तृत व खोल होते त्या त्या ठिकाणी साठलेला गाळ काढून पात्र पूर्वस्थितीत आणणे. नदीपात्रात झालेली बांधकामे, अडथळे किंवा अतिक्रमणे काढून, नदीचे पात्र पूर्ववत करणे. अशा उपायांचा अवलंब केला तर नदीचे पात्र पूर्ववत होऊन पात्रातून पाणी वाहून जाण्याची क्षमता वाढेल व पुराची तीव्रता कमी होईल, तसेच पुराचे पाणी आजुबाजूच्या प्रदेशात पसरणार नाही.

या उपाययोजनांचा अवलंब करण्यासाठी नदीच्या पात्रांचा शास्त्रोक्त अभ्यास तसेच नदीमध्ये येणाऱ्या पुरांची माहिती व वारंवारता याचा अभ्यास करून निर्णय घ्यावे लागतील. निर्णयांची अंमलबजावणी अत्यंत चोखपणे करावी लागेल. तरच आपल्याला पश्चिम घाटातून निघणाऱ्या या जीवनदायिनी नद्यांच्या पुराचे व्यवस्थित नियोजन करता येईल आणि त्याद्वारे नद्यांना येणाऱ्या पुरामुळे होणारे नुकसान टाळता येऊ शकेल.

त्याचसोबत नदीपात्रात साठलेला गाळ काढत असताना, त्यामध्ये वाळू, दगड अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणावर मागणी असलेले पदार्थ निघत असल्याने त्यांच्या उत्खननावर काटेकोर नियंत्रण आवश्यक राहील. त्यासोबत नदीपात्रात अनावश्यक खोदकाम केले जाणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. अन्यथा नदीपात्रातील नैसर्गिक डोह, खडक वगैरे नष्ट होऊन त्यामुळे नदीचा प्रवाह अधिकच वेगवान होऊन नुकसान होण्याची शक्यता वाढेल.

तज्ञांनी सुचवलेल्या या उपाययोजना सरकारने त्वरित अंमलात आणाव्यात या साठी पूरग्रस्त गावकऱ्यांनी, शहरातील नागरिकांनी सरकारी यंत्रणेला धारेवर धरणे गरजेचं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा