वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढले; रुग्णालये रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल्ल

17

पुणे, १६ डिसेंबर २०२२ : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. पहाटे दाट धुके, शीतलहरी, दिवसा कधी ढगाळ हवामान, तर कधी कडक ऊन अशा विचित्र वातावरणाचा सामना जिल्हावासीय करीत आहेत. हवामानातील बदलामुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या तक्रारी उद्भवत असून सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढले आहेत. सर्वसाधारण उपचार देणारी रुग्णालये रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल्ल होत आहेत.

मागील काही दिवसांपासून बदलत्या हवामानाचा जिल्हावासीय सामना करीत आहेत. अवकाळी पावसाच्या सावटाने या हवामानात आणखीच भर पडली आहे. कधी पाऊस, तर कधी शीतलहरी. बंगालच्या उपसागरात झालेल्या वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्याच्या परिणामामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला होता. सकाळी धुके, दिवसभर ढगाळ हवामान राहिल्याने हवेत गारठा जाणवत होता. अशा बदलत्या हवामानामुळे नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी उद्भवत आहेत. विषाणूजन्य संसर्गामुळे सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढले आहेत. विशेषतः लहान बालके व ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर कफचा त्रास उद्भवत आहे. संसर्गजन्य आजारांच्या धास्तीमुळे लवकरात लवकर उपचार घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे सर्वसाधारण दवाखानेही रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल्ल होत आहेत.

कफमुळे न्युमोनियाची धास्ती
दमट हवामानामुळे नागरिकांना सध्या ताप, सर्दी खोकल्याचा त्रास जास्त प्रमाणात आहे. तापामध्ये कफ अधिक कालावधीत राहिला तर त्याचे पर्यवसान न्युमोनियामध्ये होत असते. न्युमोनिया म्हटले, की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणे व भरमसाट बिल यामुळे पालकांना धडकीच भरत आहे. या पार्श्वभूमीवर खोकला व छातीत घरघर जाणवल्यास नागरिकांची घाबरगुंडी उडत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा