कोरोनामुळे गणपती मूर्ती कारागिरांवर आली संक्रांत

माढा, ११ ऑगस्ट २०२०: महाराष्ट्रात सर्वात मोठा कोणता उत्सव साजरा होत असेल तर तो म्हणजे गणपती उत्सव. महाराष्ट्राबरोबर संपूर्ण देशात तर गणपती उत्सव साजरा होतच असतो. पण आता, भारताबाहेरील देशात भारतीय वंशाचे रहिवासी असणारे देखील मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. परंतु, गेली चार महिने झाले कोरोना या संसर्गजन्य आजाराने गणपती उत्सवाला देखील ग्रहण लागले आहे.

गणपतीच्या मूर्ती बनवणारे कारागीर प्रत्येक वर्षी तीन ते चार महिने अगोदरच मूर्ती बनवण्याच्या तयारीत असतात. मग सुरुवातीला शाडूची माती आणणे, नंतर साचे बनविणे मूर्ती ठेवण्यासाठी मोठमोठे तंबू ठोकणे परंतु, कोरोना आजारामुळे शासनाने गणपती उत्सवाला काही निर्बंध लावले असून दोन फुटापर्यंतच गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करता येणार आहे.

प्रत्येक वर्षी मंडळांमध्ये स्पर्धा पहायला मिळायची, मोठमोठ्या मूर्ती प्रतिष्ठापना करण्याची. ती यावर्षी पाहायला मिळणार नाही. यामुळे मूर्ती कारागिरांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. कच्चामाल मोठ्या प्रमाणात घेतल्यामुळे भांडवल गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे अगोदरच खर्च भरपूर झाला आहे आणि मोठ्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेवर बंदी घातल्याने छोट्या छोट्या मुर्त्या बनवून विकाव्या लागणार आहेत. त्यामुळे लाखोंची उलाढाल ठप्प झालेली आहे.

माढा तालुक्यातील बेंबळे येथील गोरोबा कुंभार हे मूर्ती कारागीर आहेत. ते सांगतात प्रत्येक वर्षी मी तेराशे ते पंधराशे मूर्ती बनवतो व उंचीला पाच फुटांपर्यंत बनवतो. सोलापूर येथील व्यापारी ७५० ते ८०० मुर्ती विकण्यास घेऊन जातात. परंतु, कोरनामुळे मी यावर्षी ८०० मुर्त्या बनविलेल्या आहेत व बाहेरील व्यापाऱ्यांची ही ऑर्डर आली नाही. व मोठ्या मुर्त्या बनवल्या नसल्याने यामुळे माझे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा