लोणी काळभोर, दि.११ मे २०२०: १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेवर कार्यरत असणारे डॉ. राजन सोनवणे यांना भिगवण येथील एका व्यक्तीचा फोन आला. त्यानंतर डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले. नंतर पाहिले असता ती महिला ही गरोदर असल्याचे त्यांना समजले. तिची अवस्था नाजूक आहे. डॉक्टर सोनवणे यांनी तिची अवस्था पाहिली असता तिचे वय, वजन अतिशय कमी याशिवाय रक्ताचे प्रमाण निम्म्यापेक्षाही जास्त कमी आढळून आले. या महिलेचे नाव सिंधू पवार असे असून तिचे वय १९ वर्ष आहे.
महिला ही अतिशय गरीब कुटुंबातली व कातकरी समाजाची आदिवासी भाषा बोलणारी होती. खूप दूरची राहणारी व कात्रज येते मजुरीसाठी आलेली होती. तिला व नातलगांना तिच्यावर आलेल्या संकटाचे गांभीर्य नव्हते. तिला भयंकर त्रास होत होता व बारामतीला जाण्या अगोदरच रस्त्यात काहीही अडचण येऊ शकत होती, याचा विचार करून रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉ. राजन सोनवणे यांनी भिगवण येथील गोडसे नर्सिंग होमचे स्त्री रोगतज्ञ डॉ. युवराज गोडसे यांच्या शी संपर्क साधला. रुग्णाच्या शारीरिक व आर्थिक परिस्थितीची जाणीव दिली. डॉ. गोडसे यांनी तत्परता दाखवत रुग्णांनी आपली फी नाही दिली तरी चालेल. परंतू त्या रुग्णाला आपण ताबडतोब सेवा देण्यास तयार असल्याचे सांगितले.
कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीत कोणत्याही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता डॉ. युवराज गोडसे व डॉ. आदिती गोडसे यांनी या महिलेची जोखमीची परिस्थिती असतानाही प्रसूती केली.
या डॉक्टरांमुळे महिला व तिचे बाळ सुखरूप असून डॉ. सोनवणे व डॉ. गोडसे दांपत्य या घटनेमुळे आनंदी व समाधानी असल्याचे जाणवले. दोन डॉक्टरांच्या समन्वयातून रुग्णांवरील वरील संकट टळले.
न्यूज अनकट प्रतिनिधी -ज्ञानेश्वर शिंदे