कोरोना संकटकाळात भारतीय रेल्वेनं पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी बजावली महत्त्वपूर्ण भूमिका

नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर २०२० : कोरोना संकटकाळात भारतीय रेल्वेनं पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्याबरोबरच फळ आणि भाजीपाला यासारख्या नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी किसान रेलची सुरूवात करुन शेतक-यांनाही मदतीचा हात दिला आहे. गेल्या सात महिन्यातल्या रेल्वेच्या या कामगिरीचा हा वृत्तांत….

मध्य रेल्वेनं गेल्या ७ महिन्यांत १३,४०० हून अधिक मालगाड्या चालवल्या. दररोज सरासरी २७७६ याप्रमाणे एकूण ६ लाख ४४ हजारावर वाघिणिंमधून विविध वस्तूंची वाहतूक केली. औषधं, इतर वैद्यकीय उपकरणं आणि उत्पादनं अशा कोरोना काळात अनेकांचे प्राण वाचवणा-या ७५,२८२ टन जीवनावश्यक वस्तू देशाच्या काना कोप-यात पोहोचवल्या. ५९७ पार्सल गाड्यांद्वारे आणि, ४९,२०२ टन पार्सलची वाहतूक मध्य रेल्वेनं या काळात केली. यात काही पार्सल तर जीवरक्षक प्रणालींची तातडीनं पोहोचवणं आवश्यक अशी होती.

अडीच लाख वाघिणींतून कोळसा, ४२,९८५ वॅगन्स मधून सिमेंट, ५,१२७ वाघिणि भरून अन्नधान्य, ३०,२२२ वाघिणीं मधून खतं, ६०,५४१ वाघिणिंतून पेट्रोल, तेल आणि वंगण, यादी बरीच लांबेल पण सात महिन्यात रेल्वेनं मालवाहतुक अबाधित राखत कोरोना लढ्यात मोठंच योगदान दिलं आहे. याच काळात सुरू झालेल्या किसान रेल्वेलाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

सात आक्टोबरपर्यंत मध्यरेल्वेनं १२,४०० टन शेतमालाची वाहतूक केली. डाळिंब, सिमला मिरची, हिरवी मिरची, आलम, लिंबू, मासे, संत्री अशा नाशवंत मालाची किसान रेलमधून वाहतूक केली जाते. सध्या देवळाली ते मुझफ्फरपूर, नागपूर ते आदर्श नगर दिल्ली, सांगोला ते मनमाड आणि सांगोला ते सिकंदराबाद या किसान रेल गाड्या सुरू आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा