पुणे, दि. २९ जून २०२०: ‘युवक क्रांती दला’चे पुनरूज्जीवन झाल्यानंतर, मूळ लढाऊ बाणा व भारतीय राज्यघटनेशी बांधिलकीचा गाभा कायम ठेवूनही, संघटनेचे स्वरूप बऱ्यापैकी पालटून गेले आहे. मागील अनेक वर्षांपासून म्हणजेच कॉंग्रेस आणि बिगर कॉंग्रेस राजवटीही आणि भवतालच्या बदलत्या सामाजिक व राजकीय वास्तवाचे भान जपत, ‘युक्रांद’ने आपली ध्येयधोरणे नव्याने आखली, तसेच काळानुरूप नवनवीन कार्यक्रमही हाती घेतले. याची प्रचिती म्हणजे, राज्याच्या ग्रामीण, शहरी आणि आदिवासी भागातील अक्षरशः हजारो युवकयुवती ‘युक्रांद’च्या कार्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले.
मराठवाडा, नगर, विदर्भ, कोकण, आदी भागातून बहुजन समाजातील शेतकरी, मागास व कमकुवत गटातील कष्टकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील युवकवर्गास महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद शिरोमणी भगतसिंग यांच्या विचार व जीवनाची सांगोपांग ओळख करून देत, त्यांच्यावर स्वतःच्या पलीकडे जाऊन सामाजिक दृष्टी देण्याचे आणि प्रत्यक्ष विद्यायक कार्य करण्याचे संस्कार करण्यावरही ‘युक्रांद’मध्ये भर दिला जात आहे.
नैसर्गिक आपत्ती, जातीय व धार्मिक दंगली, शेतक-यांवरील अन्याय, अशा संकटसमयी आपतग्रस्तांच्या मदतीसाठी ‘युक्रांद’ नेहमीच धावून जाते आणि वेळेप्रसंगी संघर्ष करून, युवा कार्यकर्त्यांची तुरूंगातही जायची तयारी असते. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे, सर्व कार्यक्रमांची व त्याबाबतच्या धोरणांची आखणी, त्यांचे नियोजन आणि संयोजन हे पूर्णपणे युवा कार्यकर्तेच करीत असतात.
ज्याचे जे टेंपरामेंट आहे, ज्याला ज्या विषयात वा क्षेत्रात काम करण्याची आवड व गती आहे, त्यानुसार ही युवामंडळी आपल्या कामाचे क्षेत्र निवडतात, हे देखील आणखीन एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. लोकशाही मानणाऱ्या या सर्व युवकयुवतींमध्ये धोरण वा कार्यक्रमांबद्दल कितीही मतभेद होवोत, चर्चा व संवादातून एकदिलाने काम करण्यावर संघटनेचा नेहमीच भर राहिलेला आहे. मी मागील ५ ते ७ वर्षांपासून जेव्हां जेव्हां गांधीभवनवर जातो, तेव्हां तेव्हां अशा विधायक कार्यामध्ये गुंतलेल्या असंख्य युवकयुवतींनी हा सर्व परिसर गजबजलेला दिसतो.
कोरोनाच्या संकटकाळात अचानकपणे ‘लॉकडाऊन’ जाहीर झाल्यानंतर आठवड्याभरातच ‘युक्रांद’ने, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या मार्गदर्शन व सहकार्याने मदतीच्या कार्याची आखणी सुरू केली. मुळातच ‘युक्रांद’चा समाजाच्या तळागाळामध्ये काम करण्यावर भर असल्यामुळे, लॉकडाऊनमुळ पुणे शहराच्या वेशीवर वसलेल्या गावांमधील स्थलांतरित मजूर, बाहेरगावावरून आलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी, ज्यांचे हातावर पोट आहे अशा स्थानिक गोरगरिब व वंचित समाजघटकांपर्यंत अन्नधान्याचा शिधा पोहोचविण्याचे काम हाती घेण्याचे निश्चित करण्यात आले.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासून कामाला सुरूवात झाली. मोठ्या प्रमाणावर आर्थिक व वस्तुरुपाने मदत गोळा करण्याचे, किराणा सामानाची पाकीटे तयार करण्याचे कार्य ‘युक्रांद’च्या तरूण मंडळींनी मोठ्या तळमळीने व उत्साहाने अहोरात्र सुरू केले. ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ने यासाठी आवश्यक असणारी जागा, वेळोवेळीचे मार्गदर्शन आणि जनसंपर्कासाठी लागणारी उपयुक्त माहितीचे जाळे उपलब्ध करून दिले.
तळमळीने या स्वरुपाचे कार्य करणाऱ्या युक्रांदच्या कार्यकर्त्यांना, शहर व ग्रामीण भागातील अनेक व्यक्ती व संस्थांचीही मोठी साथ लाभली. हे आव्हान किती महाकाय आहे, याची सर्वांनाच कल्पना असल्यामुळे आपण जेवढे प्रत्यक्षात कार्य करू शकू आणि आपल्याला झेपेल तेवढेच काम करण्याचे पद्धतशीर नियोजन करण्यात आले. त्यामध्ये सचिन चौहान, संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, मुख्तार मणियार आणि सचिन पांडुळे, तसेच अप्पा अनारसे, रवी लाटे, सुदर्शन चखाले, या सारख्या धडाडीच्या व अनुभवी पदाधिका-यांच्या संयोजनातून, तसेच डॉ. कुमार सप्तर्षी, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन व इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्याने चांगली गती घेतली.
स्वतःचा जीव धोक्यात घालून, १ एप्रिल ते २७ जुन या ८८ दिवसांमध्ये ४९०१ किट्सचे घरोघरी तसेच काही प्रमाणात गांधीभवनवरूनही वाटप झाले. याचाच अर्थ असा की घरटी सरासरी ५ माणसे घरली तर जवळपास २४ हजारांहून अधिक नागरिकांपर्यंत किराणा पोहोचला. किराणा सामान, पिशव्या, पेट्रोल, टेम्पोभाडे असा एकूण १५ लाख ४९ हजार १६० रूपयांचा निधी यासाठी लागला. हे कार्य आवश्यकते नुसार सुरू ठेवण्याचा निर्धारही या कार्यकर्त्यांनी केला आहे.
पुणे परिसरातील कामामध्ये शहरातील अनेक संस्थांचे देखील महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने, ‘मशाल’ संस्था, ‘रोटरी क्लब ऑफ पुणे स्पोर्टस् सिटी’, ‘झेप’ फाऊंडेशन, ‘सृष्टी’ प्रतिष्ठान, ‘जीवन’ संस्था, भारतीय समाज विकास व संशोधन संस्था, अध्यात्मिक गुरू दिघेमावशी परिवाराचा ‘हेल्पिंग हॅंड’ गट, व्हीएमवेअर सॉफ्टवेअर इं. प्रा. लि, ९५ बिग एफ.एम., समता सैनिक दल, ‘सहेली’ संस्था, ‘अन्नपुर्णा’ संस्था, जिऑमित्रा सोल्युशन्स (एलएलपी), ‘पी. एम. शहा’ फाऊंडेशन, ‘अल खादीम’ फाऊंडेशन, एसबॅग्ज एग्रि. कंपनी, साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक, चेतना महिला विकास संस्था, या सारख्या अनेक संस्था, तसेच श्री. सचिन नाईक यांच्यासारख्या दानशूर व्यक्तींचे मौलिक सहकार्य लाभले.
धायरी, धनकवडी भागातील काही विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थी फी देखील भरू शकत नाहीत. परिणामी हे गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे लक्षात घेऊन, या विद्यार्थ्यांना मदत करण्याचे नियोजन संदीप बर्वे, विठ्ठल गायकवाड, लिंबराज बिराजदार या कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे. ‘युक्रांद’चे कोणत्याही प्रकारचे कार्य व कार्यक्रम हे बहुस्तरीय असतात. मदतीचे कार्यही त्याला अपवाद नाही. या पार्श्वभूमीवर गांधीभवनमध्ये सर्वांसाठी ‘संवाद व समुपदेशन केंद्र’ही सुरूच असते. त्यामार्फत, लॉकडाऊन काळातील ताणतणाव आणि इतर समस्यांवर समुपदेशन करण्यात ॲडव्होकेट प्रभा सोनटक्के यांनी पुढाकार घेतला आहे.
अशातच, रायगड जिल्ह्यावर वादळाचे मोठे संकट आदळले. युक्रांदच्या पुणे शहर युनिटच्या वतीने, रायगडच्या माणगाव तालुक्यातील आदिवासीवाडी, मुघवल, वडघर आदी पाड्यांमधून गरजू आदिवासी बांधवांना रेशनचे किट्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या कामी त्यांना ‘आमचं कुटुंब’, ‘साने गुरूजी राष्ट्रीय स्थानक’, ‘झेप’ सारख्या संस्थांच्या मदतीने कोकणातही काम सुरू झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी