काठमांडू, ४ ऑगस्ट २०२०: हे सर्वश्रुत आहे की नेपाळ पूर्णपणे चीनच्या प्रभावाखाली आलेला आहे. नेपाळचा चीन कडील वाढता कल तसेच नेपाळमधील आंतरिक राजकारणामध्ये चीनचा असलेला हस्तक्षेप याचा बचाव नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ज्ञवाली यांनी केला आहे. नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, आधी आमचा कल भारताकडे होता परंतु आता आमची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे.
नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ज्ञवाली म्हणाले की, “चीनचा नेपाळवर प्रभाव वाढत आहे, तसेच नेपाळच्या आंतरिक राजकारणामध्ये देखील चीन हस्तक्षेप करत असल्याचा आरोप खरंच संतापजनक आहे. आम्ही हे वारंवार सांगितले आहे की, आम्ही संतुलित आणि देशाच्या हितार्थ असे संबंध प्रस्थापित करत आहोत. आम्ही आमच्या शेजारील चीन आणि भारत या दोन्ही देशांसोबत समजदारीने आणि सहयोगाने पुढे जात आहोत. दोन्ही देशांशी असलेले संबंध आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. कोणत्याही एका देशासाठी आम्ही इतर दुसऱ्या देशाशी संबंध खराब करू इच्छित नाही.”
प्रदीप ज्ञवाली म्हणाले की, “सध्या नेपाळ चीनशी आपले संबंध सुधारत आहे, वास्तविक हे संबंध याआधीच सुधारले गेले पाहिजे होते. कारण, इतिहासामध्ये बघितले तर नेपाळचा एकाच देशाकडे कल जास्त झालेला दिसत आहे. आम्ही त्यामध्ये सुधारणा करत आता दोन्ही देशांसोबत समजदारीने आणि सहयोगाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ नेपाळचा कल ना चीन कडे आहे ना भारताकडे आहे. आम्ही एकाच देशावर निर्भर राहण्याची नीती बदललेली आहे. आम्हाला कनेक्टिव्हिटीला ‘विविधता’ द्यायची आहे. म्हणूनच, आम्ही चीनबरोबर परिवहन करार केला. आम्हाला बहुपक्षीय कनेक्टिव्हिटी नेटवर्क केवळ भारतच नव्हे तर चीनशीही जोडायचे आहे जेणेकरून आमच्याकडे अधिक पर्याय असतील.”
नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ज्ञवाली म्हणाले, “आम्हाला माहित आहे की भारत आणि चीनमध्ये वाद आहे. पण, २१ व्या शतकाला आशियाई खंडाचे शतक म्हटले जाते. या संदर्भात चीन आणि भारत यांच्यातील सर्वोत्तम सामंजस्य आणि सहकार्याचा विकास झाला तर या प्रदेशात स्थिरता आणि समृध्दी वाढवेल, एवढेच नाही तर ते जागतिक शांततेसाठी एक उपलब्धी ठरेल. त्यामुळे या दोन्ही देशांमधील सहकार्य आणि समंजस वाढणे गरजेचे आहे. आम्हालाही हे हवे आहे. ”
न्यूज अनकट प्रतिनिधी