काठमांडू, २८ डिसेंबर २०२२ : नेपाळमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नेपाळमध्ये बुधवारी पहाटे एका तासात दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल अर्थक्वेक मॉनिटरिंग एंड रिसर्च सेंटर नेपाळ कडून मिळालेल्या माहितीनुसार, बागलुंग जिल्ह्यात दोनवेळा भूकंपाचे धक्के बसले.
एनईएमआरसी कडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिला भूकंप स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री एकच्या दरम्यान झाला. या भूकंपाची तीव्रता ही ४.७ रिश्टर इतकी आहे. तर दुसरा भूकंप बागलुंग जिल्ह्यातील खुंगा या भागात दोन वाजून सात मिनिटांनी झाला. या भूकंपाची तीव्रता ही ५.३ रिश्टर इतकी होती. यामध्ये अद्यापतरी कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.
उत्तराखंडमध्येही भूकंपाचे धक्के!
यापूर्वी उत्तराखंडमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. उत्तरकाशीमध्ये मंगळवारी रात्री २ वाजून १९ मिनिटांनी भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ही ३.१ रिश्टर इतकी होती. डिसेंबर महिन्यात उत्तराखंडात अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.