सातारा, १६ सप्टेंबर २०२०: देशात पालेभाज्यांचे भाव वाढताना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं काल कांद्याची निर्यात थांबवली. मागच्या वर्षी कांद्यानं शतकी खेळी केले होती. यावर्षीही पावसानं कांद्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. त्यामुळं यंदाही कांद्याचे भाव गगनाला भिडू नयेत म्हणून सरकारनं निर्यातीवर बंदी आणली होती. मात्र, यावर शेतकऱ्यांकडून व विरोधी पक्षाकडून विरोध केला जातोय.
काल शरद पवारांनी देखील केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला होता. तसेच अनेक शेतकरी संघटनांनी देखील आंदोलनाचा इशारा दिला होता. यातच आता भाजपला आपल्याच पक्षातून या निर्णयाला विरोध होताना दिसतोय. भाजपचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी कांदा निर्यात बंदीला विरोध करून भाजपला घरचाच आहेर दिलाय.
सध्या लॉकडाऊनमुळं शेतकरी बॅकफूटवर गेला असताना ग्राहक संरक्षण मंत्रालयानं सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळं कांदा निर्यातबंदी बाबत सरकारनं घेतलेला निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी एका पत्रात केलीय.


काय म्हणाले आपल्या पत्रात
“केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयानं सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा आहे. बाजारातील कांद्याच्या वाढत्या किंमतीच्या आधारावर केंद्र सरकारनं केलेली निर्यातबंदी ही शेतकऱ्यांनी उद्ध्वस्त करणारी आहे. केंद्र सरकारनं या निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागं घेऊन, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं मला वाटतं.”
“कांद्याचे उत्पादन करणारा शेतकरी हा गरीब आहे. कोरोना काळात खरं तर संपूर्ण देशाला सावरण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं. संपूर्ण देशाला अन्नधान्य आणि भाजीपाल्याची कमतरता भासू दिली नाही. आज जगभरात कांद्याला मोठी मागणी आहे. अशावेळी निर्यातबंदी केल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. हजारो टन कांदा निर्यातीसाठी पडून आहे. जेव्हा भाव कोसळतात तेव्हा कांदा फेकावा लागतो. पण, आज कांद्याला चांगला भाव मिळत असताना असा निर्णय घेणं यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे. त्यामुळं सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी त्वरीत मागं घ्यावी, जेणेकरुन शेतकऱ्यांना दिलासा मिळल.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे