ईडीचा युक्तीवाद, राऊतांना चार ऑगस्टपर्यंत कोठडी

मुंबई, १ ऑगस्ट २०२२: ईडीने आज आपला युक्तीवाद सुरु केला. न्या.एम.जी.देशपांडे यांच्यासमोर राऊतांना हजर करण्यात आले होते. राऊतांना आठ दिवसांची कोठडी ईडीने मागितली होती. ॲड. अशोक मुदरंगी हे राऊतांच्या बाजूने लढत होते. ईडीकडून हितेन वेणेगावकर हे युक्तीवाद करत होते.

ईडीने केलेला युक्तीवाद – यावेळी ईडीने सांगितले की, संजय राऊत यांनी प्रविण राऊत यांच्या नावावर गैरव्यवहार केला आहे. प्रविण राऊत हे केवळ नावाला असून सर्व व्यवहार हे संजय राऊत करत होते. राऊतांना पत्राचाळ गैरव्यवहारात आर्थिक फायदा झाला. प्रविण राऊतांनी संजय राऊतांना महिन्याला दोन लाख रुपये दिले. राऊतांच्या परदेश दौऱ्यासाठी प्रविण राऊत यांनी पैसे दिले. तसेच प्रविण राऊत हे व्यावसायिक असून त्यांचा पैसा संजय राऊत वापरत होते. असे अनेक प्रकारचे आरोप ईडीने केले.

राऊतांच्या वकिलांचा युक्तीवाद- राऊतांचे वकिल मुदरंगी यांनी युक्तीवाद करताना सांगितले की, संजय राऊत यांची अटक राजकिय हेतूने झाली आहे. संजय राऊतांवर इतके दिवस कारवाई का केली नाही? असाही सवाल राऊतांच्या वकिलांनी विचारला आहे. महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर ही कारवाई झाली आहे, असे का केले? असा सवाल त्यांनी विचारला. कोठडी द्यायची असेल तर तो कालावधी कमी कालावधी ठेवा, असंही त्यानी कोर्टाला सांगितले. संजय राऊत यांना हृदयाचे विकार असल्यानं हा कालावधी कमी करावा, असं मुदरंगी यांनी सांगितलं. तसेच संजय राऊत यांची चौकशी होत असताना वकिलांना उपस्थित राहण्याची मागणी संजय राऊताच्या वकिलांनी केली.

या पार्श्वभूमीवर संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंतची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना घरचं जेवण आणि औषधे, सकाळी साडे आठ ते साडे नऊ या काळात वकिलांना भेटण्याची मुभा आणि रात्री साडेदहानंतर राऊतांची चौकशी होणार नाही. या अटी मान्य करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे आता ईडी पुढे काय कारवाई करते आणि त्यातून काय निर्णय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा