मुंबई, २० जुलै २०२३ : मुंबई महापालिकेतील कोव्हिड काळातील घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली. अनेक छापेमारी आणि चौकशीनंतर अखेर ईडीने सुजीत पाटकर यांना अटक केली आहे. त्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे पाटकर यांच्या अटकेमुळे राऊत यांना मोठा धक्का बसल्याचेही सांगितले जात आहे. पाटकर यांना आता कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे.
कथित कोविड सेंटरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याच प्रकरणाी २१ जून रोजी ईडीकडून मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. मुंबईतील तब्बल १५ हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी केल्याची माहिती समोर आली होती.यावेळी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यासह मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पुरवठादार आणि शहरात कोविड मशिनरी उभारण्यास मदत करणाऱ्या लोकांच्या आणि इतरांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. आता अखेर ईडीकडून सुजीत पाटकर यांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई महापालिका कोविड घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी आरोप केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले होते. यानंतर संजय राऊत यांनी ते माझे फक्त मित्र असल्याचे म्हटले होते.ईडीच्या चौकशीत सुजीत पाटकरांच्या घरी अलिबागच्या जमिनीच्या व्यवहाराचे पेपर मिळाले होते. ज्या व्यवहारात पाटकरांची पत्नी आणि वर्षा राऊतांची नावे होती. लाईफसायन्सेस हॉस्पिटल अँड मॅनेजमेंट या फर्ममध्ये मी भागीदारांपैकी एक आहे. परंतु कंपनी डॉ. हेमंत गुप्ता यांच्या मालकीची आहे आणि वरळी येथील त्यांच्या क्लिनिकच्या नावावर ती नोंदणीकृत आहे, असे सुजित पाटकर म्हणाले होते.