अनिल देशमुखांच्या जामीनाविरोधात ईडीची सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई, १० ऑक्टोबर २०२२: मनी लॉड्रींग प्रकरणी कोठडीत असलेले अनिल देशमुख यांच्या जामीनाविरोधात ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला ईडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर या विरोधात ईडीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याकरिता ईडीला १३ ऑक्टोंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु मुदत संपण्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात ईडीच्या वतीने धाव घेण्यात आली आहे.

शंभर कोटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तसेच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये करण्यात आलेल्या गैरव्यवहार प्रकरणास ईडीच्या वतीने मागील नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मागील आठवड्यात अनिल देशमुख यांना अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला होता. याच विरोधात ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

काय आहे प्रकरण ?

मुंबईतील बार अँड रेस्टॉरंट मालकांकडून खंडणी वसुलीबाबत माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशीचा आदेश दिला. त्यानंतर प्राथमिक चौकशीअंती सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला. या एफआयआरच्या आधारे सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) गुन्हा नोंदवून देशमुख आणि पलांडे व शिंदे यांना अटक केली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा