ईडी कार्यालयाचा फलक मराठीत, मराठी एकीकरण समितीच्या पाठपुराव्याला यश

4

मुंबई १५ जून २०२३: केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ईडीच्या नोटीसीने भल्याभल्यांचा थरकाप उडतो. अनेकांनी ईडीचा धसका घेतला आहे. परंतु या केंद्रीय संस्थेच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयाच्या फलकावर, केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेतच कार्यालयाचे नाव लिहीलेले होते. त्यामुळे मराठी एकीकरण समितीने यासंदर्भात पत्र लिहून, मराठी भाषेत कार्यालयाचा फलक लिहीण्याची मागणी केली होती. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने कार्यवाही करत, मराठी भाषेत फलक लिहीण्याचे आदेश दिले. त्यानंतर फलकावर मराठीत नाव लिहिण्यात आले.

ईडीच्या दक्षिण मुंबईतील बेलार्ड ईस्टेट कार्यालयाच्या समोरील भागातील फलकावर कार्यालयाचे नाव, केवळ इंग्रजी आणि हिंदी भाषेत लिहीलेले होते. त्यामुळे मराठी भाषेला तिच्या राज्याच्या राजधानीतच स्थान मिळत नसल्याचा मुद्दा ‘मराठी एकीकरण समितीने’ उचलून धरला. मराठी भाषेला डावलले जात असल्याने फलकावर मराठी भाषेतही कार्यालयाचे नाव लिहिण्याची मागणी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केली होती.

ईडीचे कार्यालय अनेक वर्षापासून महाराष्ट्रात आहे. अनेक दिग्गज इथे जाऊन आले पण फलकावर मराठी नाही याची उणीव कोणालाही भासली नाही. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राप्रमाणे स्थानिक भाषेचाही समावेश फलकावर असायला हवा होता. ईडी अनेकांना नोटीस धाडते, परंतू मराठी एकीकरण समितीने ईडीला नोटीस धाडून फलकावर मराठी भाषेत कार्यालयाचे नाव आणले. मराठी एकीकरण समितीकडून २०१९ पासून फलकासाठी पाठपुरावा सुरू होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा