सांगलीत प्रसिद्ध उद्योगपती पारेख बंधूंच्या घरी ईडीचा छापा, तब्बल १२ तास झाडाझडती

सांगली २४ जून २०२३: राज्यात मुंबईसह पुण्यात गेल्या काही दिवसांपासून ईडीने छापेमारी सुरू केली आहे. मुंबईतील कोव्हिड टेंडर घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुंबई पुण्यात छापेमारी केली. ह्या कारवाया सुरू असतानाच काल सांगलीतही ईडीने छापेमारी केली. पण सांगलीतील छापेमारीचा मुंबईतील कोव्हिड घोटाळ्याशी काहीच संबंध नाही. सांगलीत प्रसिद्ध उद्योगपती पारेख बंधूंच्या घरावर छापेमारी करण्यात आली, त्यामुळे सांगलीमध्ये एकच खळबळ उडालीय.

दिनेश पारेख आणि सुरेश पारेख हे पारेख बंधू मोठे उद्योजक, कॉन्ट्रॅक्टर आणि मेडिकल क्षेत्रामधील नावाजलेले प्रस्थ आहेत. पारेख बंधूंच्या घरावर ईडीने छापेमारी करण्यामागचे कारणही समोर आलय. पारेख बंधू अनेकांना फायनान्स करत असल्याने, तसेच त्यांच्या व्यवसायात आर्थिक अनियमितता असल्याने, त्यांच्या घरावर धाड मारण्यात आल्याचे सांगितले जातय. ही छापेमारी ईडीने केल्याचे सूत्रांनी सांगितले.

काल सकाळीच ईडीच्या दोन पथकांनी पारेख बंधू यांच्या घरावर छापा टाकला. ईडीने पारेख बंधूंच्या घरातील कागदपत्रांची छाननी केली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील गाड्यांचीही तपासणी केली. तब्बल बारा तासाहून अधिक वेळ ही चौकशी सुरू होती. शिवाजी नगर येथील पारेख बंधूंच्या दोन बंगल्यांवर ही धाड टाकण्यात आली. यावेळी बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती. या धाडीनंतरच्या चौकशीचा अधिक तपशील देण्यास ईडीने नकार दिला.

पारेख बंधूंसारख्या बड्या प्रस्थांच्या बंगल्यावर धाडी पडल्याचे ऐकल्यावर, सांगलीत उलटसुलट चर्चांना उधाण आले. या चर्चांच्या अनुषंगाने, धाड मारणारे अधिकारी ईडीचेच आहेत का? याची खातरजमा करण्यासाठी विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकाऱ्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणला नाही. सांगलीतील या छापेमारी ने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा