मुंबई, २० ऑगस्ट २०२३ : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. ईडीने १७ ऑगस्टला (गुरुवारी) राज्यातील जळगाव, नाशिक आणि ठाण्यात १३ ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान, ईडीने सुमारे ४० किलो सोने आणि १.११ कोटी रोख आणि काही कागदपत्रे जप्त केली. हे प्रकरण कर्ज फसवणुकीच्या मनी लाँड्रिंगचे आहे.
ईडीचे छापे राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आरएल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड, मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन लालवानी, मनीष ईश्वरलाल जैन लालवानी, पुष्पा देवी आणि नीतीका मनीष जैन यांच्याशी संबंधित आहेत.
ईडीने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आरएल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड आणि मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन लालवानी, मनीष ईश्वरलाल जैन लालवाणी, पुष्पा देवी आणि नीतीका मनीष यांच्या कर्ज फसवणुकीच्या संदर्भात तसेच मनी लाँड्रिंगच्या तपासासंदर्भात, १७ ऑगस्ट रोजी पीएमएलए, २००२ च्या तरतुदीनुसार जळगाव, नाशिक आणि ठाणे येथे १३ परिसरांची झडती घेण्यात आली.
शोध मोहिमेदरम्यान विविध कागदपत्रे, २४.७ कोटी रुपयांचे ३९.३३ किलो सोने, हिऱ्यांचे दागिने आणि १.११ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली, असे ईडीने सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड