ED कडून मनीष सिसोदियांची ५२ कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली, ८ जुलै २०२३ : आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि त्यांची पत्नी यांची एकूण ५२ कोटींची मालमत्ता ED अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे. या कारवाईबाबत तपास यंत्रणेकडून माहिती देण्यात आली आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने सिसोदिया यांना जामीन नाकारल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे.

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना मद्य विक्री घोटाळा प्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून २६ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे. पाच दिवसांपूर्वी म्हणजेच ३ जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयानेही मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला, त्यानंतर सिसोदियांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि पत्नी सीमा सिसोदिया यांच्या प्रकृतीचे कारण देत सिसोदिया यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.

काय आहे प्रकरण?
१७ नोव्हेंबर २०२१ मध्ये केजरीवाल सरकारने राज्यात नवीन मद्य धोरण लागू केले. त्यामध्ये राजधानीत ३२ झोन तयार करण्यात आले होते , त्या प्रत्येक झोनमध्ये जास्तीत जास्त २७ दुकाने उघडण्यात येणार होती. अशा प्रकारे एकूण ८४९ दुकाने उघडली जाणार होती. नवीन मद्य धोरणात दिल्लीतील सर्व दारूची दुकाने खासगी करण्यात आली होती. याआधी दिल्लीतील ६० टक्के दारूची दुकाने सरकारी आणि ४० टक्के खासगी होती. नवीन धोरण लागू केल्यानंतर ती १०० टक्के खासगी झाली आहे. या धोरण प्रकरणात वाद वाढू लागल्याने हे धोरण रद्दही करण्यात आलं आहे. दिल्ली सरकारने या धोरणातून उत्पन्नात लक्षणीय अशी २७ टक्के वाढ नोंदवली. ज्यामुळे कोटींचे उत्पन्न दिल्ली सरकारला मिळालं होतं.

याचदरम्यान दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आणि दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी, या प्रकरणात गैरप्रकार झाल्याच मत व्यक्त केल. या धोरणाविरोधात उपराज्यपालांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. गेल्या वर्षी सीबीआयने मनिष सिसोदिया यांच्या घरासह ३१ ठिकाणी छापे टाकण्यात होते. या प्रकरणात यापूर्वीही अनेकांना अटक करण्यात आली आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, मनिष सिसोदिया यांच्या ५२ कोटी रुपयांच्या या मालमत्तेमध्ये त्यांची पत्नी सीमा सिसोदिया यांच्या दोन मालमत्ता आहेत. तर राजेश जोशी आणि गौतम मल्होत्रा यांच्या ८ कोटी २९ लाख रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे. यामध्ये ४४ कोटी २९ लाख रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे. त्यामुळे आता मनिष सिसोदिया यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं दिसत आहे. तसेच सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळणार की, त्यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होणार हे येत्या काळात कळेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा