मुंबई, १७ जुलै २०२१: अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखीन वाढ होताना दिसत आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आलीय. ईडीने देशमुख कुटुंबियांची एकूण ४ कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त केलीय. ईडीने देशमुख कुटुंबियांची मुंबई आणि उरणमधील मालमत्ता जप्त केलीय. १०० कोटी रुपये वसुली प्रकरणात ईडीने ही पहिली मोठी कारवाई केली आहे. त्यामुळं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पाय अजून खोलात जाण्याची शक्यता आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळं अनिल देशमुख अडचणीत सापडले आहेत. परमबीर सिंग यांनी १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा देशमुखांवर आरोप केलाय. तेव्हापासून देशमुखांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. देशमुखांना ईडी कडून याआधी चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, देशमुखांनी प्रकृतीचं कारण पुढं करत, गैरहजर राहिले.
या संपत्तीवर करण्यात आली कारवाई
अनिल देशमुख यांच्या वरळीमधील सुखदा या इमारतीमधील डुप्लेक्स फ्लॅटपैकी एक फ्लॅट जप्त करण्यात आलाय. हा प्लॅट देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या नावावर आहे. या फ्लॅटची किंमत १ कोटी ५४ लाख रुपये आहे. दुसरीकडे उरणजवळील धुतूम गावात देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांच्या कंपनीकडून जमीन खरेदी करण्यात आली होती. त्या जमिनीतील काही फ्लॅटवर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या जमिनीची किंमत २ कोटी ६७ लाख रुपये आहे. त्याचबरोबर देशमुख यांची नागपुरातील काही मालमत्ताही सील करण्यात आल्याचं बोललं जात आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात देशमुखांवर ही मोठी कारवाई करण्यात आलीय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे