नवी दिल्ली, 21 जून 2022: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पाचव्या दिवशीही चौकशी सुरूच आहे. ईडीने त्यांना मंगळवारी पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावलंय. त्यांना पुन्हा हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत ते चार वेळा ईडीच्या कार्यालयात गेले असून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत.
एकीकडे राहुल गांधींवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा हा प्रकार वाढत आहे, तर दुसरीकडे काँग्रेसची रस्त्यावरील निदर्शनंही वाढत आहे. राजधानी दिल्ली हे विरोधाचे केंद्र राहिलं असताना इतर राज्यांतील काँग्रेस कार्यकर्ते या कारवाईला कडाडून विरोध करत आहेत. सोमवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली. त्यांना निवेदन देण्यात आलं असून, त्याद्वारे ईडीच्या कारवाईला विरोध करण्यात आला आहे. याशिवाय अग्निवीर योजनेबाबत सुरू असलेल्या गदारोळाचाही उल्लेख करण्यात आलाय.
सध्या ईडी राहुल गांधींची अनेक मुद्द्यांवर चौकशी करत आहे. यंग इंडियासोबतच्या व्यवहारांवरून सर्वाधिक वादात सापडलेली कोलकात्याची डोटेक्स कंपनी हे प्रश्नोत्तरांचं एक केंद्र आहे. 2010 मध्ये डोटेक्स कंपनीने यंग इंडियाला एक कोटी रुपये दिल्याचा आरोप आहे. भाजपच्या म्हणण्यानुसार ते पैसे कधीच परत आले नाहीत.
अशा सर्व व्यवहारांच्या चौकशीदरम्यान राहुल गांधींनी सांगितलं होतं की, दिवंगत मोतीलाल व्होरा हे सर्व व्यवहार पाहत असत. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, राहुल यांनी प्रश्नोत्तरादरम्यान त्यांचा उल्लेख केला आहे. मात्र या संदर्भात मोतीलाल व्होरा यांच्या मुलाशी बोलले असता त्यांनी ते वृत्त फेटाळून लावलं. राहुल गांधी आपल्या वडिलांबद्दल असे बोलू शकत नाहीत, असा आग्रह धरण्यात आला. लवकरच राहुल गांधी या प्रकरणात निर्दोष सिद्ध होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे