खाद्य तेलाचे भाव कडाडले

मुंबई, २४ ऑक्टोबर २०२०: यंदा सणासुदीच्या तोंडावर लोकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे. सध्या कांदा व इतर भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले आहेत त्यातच आता खाद्य तेलाचे भाव देखील वाढणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळं गृहिणींच्या बजेट वर चांगलाच भार पडणार आहे. दिवाळी आणि दसरा तोंडावर असताना तेलांच्या किमतीत वाढ झाल्याने अनेकांचे सण बेचव होतात की काय असा प्रश्न उभा राहिलाय. कोरोनामुळं आधीच लोकांची काम गेली आहेत आणि त्यात महागाईचे संकट ओढवले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजार, नैसर्गिक आपत्ती, वाढीव कस्टम ड्युटी आणि तेलाचा कृत्रिमसाठा अशा वेगवेगळ्या कारणांमुळे तेलाच्या दरात वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सोयाबीन, पाम तेल आणि सूर्यफुल तेल अशा खाद्यतेलांचे भाव वाढले असून शेंगदाणा तेलाच्या दरात घसरण झाली आहे.

यंदा पावसामुळं शेतीच मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे बाजारात अनेक पिकांचा तुटवडा पडत आहे. दरवर्षी सोयाबिनच्या तेलाची आवक ही सप्टेंबरमध्ये होते. मात्र, यावर्षी परतीच्या पावसाने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आवक होऊ शकली नाही. काही व्यापाऱ्यांच्या मते तेलाचे भाव वाढणार असल्याचे संकेत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कृत्रिम साठा केल्याचाही परिणाम तेलाच्या दरावर झाला आहे.

सध्याचे भाव

सूर्यफूल तेलाचा आधीचा बाजार भाव १५ लिटरच्या डब्यामागे १५०० रुपये इतका होता. तर सध्याचा भाव हा १७०० ते १८०० रुपये इतका आहे. पाम तेलाचा आधीचा बाजार भाव हा १००० ते ११०० रुपये एवढा होता. तर सध्याचा भाव हा ३०० रुपयांनी वाढला असून पाम तेल हे १४०० ते १५०० रुपये इतके झाले आहे. मात्र, शेंगदाणा तेलाच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. शेंगदाणा तेलाचा आधीच बाजार भाव हा २४०० रुपये इतका होता. मात्र, सध्याचा भाव हा २१०० रुपये इतका झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा