मोफत गणवेश वाटपाच्या निर्णयावर शिक्षण विभागाचा यु टर्न, शाळा व्यवस्थापन समितीने सुवर्ण मध्य साधून गणवेश द्यावेत

मुंबई, ९ जून २०२३ : एक राज्य एक गणवेश या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या मोफत गणवेश ल वाटपाच्या निर्णयावरून शिक्षण विभागाने यु टर्न घेतला आहे. नव्या शैक्षणिक वर्षामध्ये पात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेशाचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात येणार आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांपासून शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांकडून शिलाई करुन एक सारखे एका रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ या वर्षासाठी समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यासाठी निर्णयात काहीसा बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये पात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेशाचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात यावा, यासाठी केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे निधी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी वितरीत करावा, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

परंतु आता मोफत गणवेश योजनेंतर्गत अनेक शाळांनी आणि कापड उद्योजकांनी शिक्षण विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय सन २०२३-२४ या वर्षासाठीचे गणवेश तयार करण्याचे काम केले आहे. तयार केलेल्या या गणवेशामुळे संबंधिताचे आर्थिक नुकसान होवू नये म्हणून शासनाने शाळा व्यवस्थापन समितीस उपलब्ध करुन दिलेल्या निधीमधून सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांसाठी एक गणवेश शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित केल्यानुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात यावा. तर विद्यार्थ्यांना उर्वरित एक गणवेश स्काऊट व गाईड विषयास अनुरूप (मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पैंट तसेच, मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची) शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात यावा,असे शासन निर्णयात सांगण्यात आले आहे.

शाळेमध्ये स्काऊट आणि गाईड या विषयाच्या तासिका आठवडयातून दोन दिवस असतात. त्यापैकी एक तासिका शक्यतो शनिवारी असते. त्यामुळे मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी स्काऊट आणि गाईड विषयास अनुरूप उपलब्ध करुन देण्यात येणारा गणवेश विद्यार्थ्यांनी परिधान करणे आवश्यक राहील. तसेच, उर्वरित सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवस शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित केलेल्या रंगाचा गणवेश परिधान करण्यात यावा असे सांगण्यात आले आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच सन २०२४-२५ पासून शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांकडून शिलाई करुन एक समान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळं सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये मोफत गणवेश योजनेबाबत स्थानिक स्तरावर कोणतीही कार्यवाही करु नये. याबाबतच्या आवश्यक त्या सविस्तर सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील, असेही या शासन निर्णयात म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा